सर्वोत्तम भूमिपुत्र : प्रति(क)क्रांतीचे बीज


मंगळवार, १८ एप्रिल, २०१७

सर्वोत्तम भूमिपुत्र : प्रति(क)क्रांतीचे बीज



सर्वोत्तम भूमिपुत्र : गोतम बुद्ध हे आ.ह. साळुंखे लिखित पुस्तक वाचले. त्या पुस्तकावर आंबेडकरी बौद्धांकडून काही आक्षेप घेण्यात आलेले आहेत. मला सर्व आक्षेप माहीत नसले तरी आ.ह. साळुंखे यांच्या दुसऱ्या पुस्तकात त्यातील काही आक्षेपांचा विचार करून त्यांनी त्याला प्रतिउत्तर दिलेली आहेत. त्या दुसऱ्या पुस्तकाचे नाव 'सर्वोत्तम भूमिपुत्र : आक्षेप डॉ. आंबेडकरांची विचारधारा आणि लेखकाची भूमिका' हे आहे. हि दोनीही पुस्तक वाचल्यानंतरच हा लेख मी लिहायला घेतलेला आहे. आ.ह. साळुंखे यांची मी इतरही पुस्तके वाचली असली तरीही या लेखात त्यांचा विचार सहसा केलेला नाही. 

या लेखाचं नाव 'सर्वोत्तम भूमिपुत्र : प्रतिक्रान्तीचे बीज'हे ठेवण्याचं कारण या लेखातील पुढे होणाऱ्या चर्चेतून समोर येईलच.

साळुंख्याची भाषा गोड म्हणून अनेक जण त्यांच्या भाषेला भुलले आहेत. त्यांच्या मांडलेल्या डावात अनेक जण हळूच अडकले आहेत. हा डाव मोडून काढण्याच मी माझं कर्तव्य समजतो म्हणून हा लेख मी लिहायला घेतलेला आहे.

★ अत्त-दीप-भवं (स्वयं प्रकाशित व्हा)

आ.ह. साळुंखे म्हणतात :-

एकदा श्रावस्तीमध्ये तथागत भिक्खूना म्हणाले " भिक्खूनो अत्तदीप ( आत्मद्वीप ), आत्मशरण , अनन्यशरण, धम्मद्वीप, धम्मशरण, अनन्यशरण होऊन विहार करा"

यावर भाष्य करताना आक्षेपकानी आ.ह. साळुंखे यांच्यावर धम्मात आत्मा पेरण्याचे कारस्थान रचल्याचा आरोप केलेला आहे.

मूळ ग्रंथात आपल्याला कोठेही आत्म शरण म्हणजे स्वतः स्वताला शरण जाणे अश्या  अर्थाच कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. किंवा तसा अर्थही स्पष्ट होताना आपल्याला दिसत नाही. उलट अत्तदीप याचे भाषांतर स्वतः स्वतःचा दिवा हो यावर आ.ह. साळुंखे प्रश्नचिन्ह निर्माण करताना दिसतात. स्वाभाविक पणे वाचकांच्या मनात एक प्रकारचा संभ्रम निर्माण होतो. 

हा संभ्रम निर्माण व्हावा हीच साळुंख्यांची इच्छा असावी ?

शरीराला आत्मा माना हे चार्वाक तत्वज्ञान आहे. हेच प्रक्षिप्त तत्वज्ञान त्रिपिटकात आलेलं आहे. त्याचाच आधार आ.ह. साळुंखे यांनी घेतला आहे.

शरीर अनात्म आहे, अज्ञानी मनुष्यच एखाद्या गोष्टीला आत्मा मानेल, अनात्मला आत्मा मानणे हा संज्ञा विपर्यास आहे, चित्तविपर्यास आहे, दृष्टी विपर्यास आहे अश्या अर्थाची बुद्ध वचने आहेत.  हे साळुंख्याना चांगलं माहिती आहे तरी त्यांनी हा संभ्रम ठेवला त्याचं कारण चार्वाकाच्या त्या मताला त्यांना त्रिपिटकातील प्रक्षिप्त अश्या वचनाचा आधार मिळतो.

खरतर शब्दांची निवड साळुंखे इतक्या काळजीपूर्वक करतात कि कोणत्याही संशयाला ते जागा ठेवत नाही. उदा: व्यसपीठाला ते विचारपीठ च म्हणतात. आर्य सत्याला चुकूनही ते आर्य सत्य म्हणणार नाहीत. एकतर फक्त 'सत्य' असा शब्द प्रयोग ते करतील किंवा मग पर्याय नसेल तर आर्यचे पाली रूप अरिय हे वापरताना दिसतील. ग्रंथातील शब्द पालित वापरण्याचे खरे कारण हे आहे. त्यातहि ते सोईनुसार पाली शब्द वापरतात. 

दोन विरोधी मतामधील एक मत प्रक्षिप्त असत हे सहज काळण्यासारखं आहे. आ.ह.साळुंखे यांनाही याची जाणिव आहे. पण तरी ते मत ते प्रक्षिप्त मानत नाहीत याच कारण त्यांना चार्वाक प्रिय आहे. त्यामुळेच त्या मताला ते प्रक्षिप्त मानत नाहीत. 

मला सुद्धा चार्वाकाची काही मत पटत असली तरी त्याची मत मी इतरांच्या तोंडी मारू शकत नाही. आणि हेच नेमकं आ.ह. साळुंखे यांनी केलं आहे.

★ सिद्धार्थाच्या गृहत्यागाची कारणे

सिद्धार्थाच्या गृहत्यागाची कारण शाक्य - कोलिय वाद हे कोसंबीनी मांडलेले मत साळुंख्येना मान्य नाही. त्यांच्या मते लहानपणापासूनच विरक्तीची भावना गौतमाच्या मनात निर्माण झालेली होती. 

कोसंबींच्या मतांचं खंडन साळुंख्याना करता आलेलं नाही. पण त्यांनी तसे केले आहे असा दिखावा मात्र आणलेला आहे.

अठ्ठकथेत ज्या काळाचं शाक्य-कोलिय संघर्षाचे संदर्भ आलेले आहेत. तो बुद्धत्व प्राप्ती नंतरचा आहे. हे खरेच आहे. पण तथागत त्या समयी आपल्याला अशाच संघर्षामुळे घर सोडावं लागलं हा धागा त्या ठिकाणी देतात.

पाण्यावरून शाक्य आणि कोलिय संघर्ष नेहमी होत. असे कोसंबींचे मत असून बुद्धत्वप्राप्तीनंतर हा संघर्ष बुद्धांनी कायमचा मिटवला.

साळुंखे यांनी तो नीट समजून घेतला नसावा. त्यांनीच पुढे सयुक्तनिकायातील उतारे दिलेले आहेत.

मारकन्या तृष्णा व सिद्धार्थामधील संभाषण आहे.

मारकन्या तृष्णा : तुझे वित्त गेले आहे काय ? गावात अपराध तर केला नाहीस ?

सिद्धार्थ : उद्दिष्टांची प्राप्ती करणे, हृदयाची शांती मिळवणे , प्रिय आणि मोहक गोष्टींची सेना जिंकणे यासाठी मी एकटा ध्यान करतो. आणि असे करण्याने मला सुख प्राप्त होते.

यातही कोसंबींच्याच म्हणण्याला पाठींबाच मिळतो. पण साळुंखे त्याचा अर्थ भलताच लावतात.

★ स्थितप्रज्ञ आणि स्थितचित्त

आ.ह. साळुंखे यांनी बुद्धाला स्थितप्रज्ञ हा शब्द लावलेला आहे. यावर आक्षेपकांकडून आक्षेप घेण्यात आला आहे.

प्रातिउत्तरादाखल साळुंखे यांनी जी मते मांडलेली आहेत ती कोणालाही पटण्यासारखी नाहीत. पण त्यांचे मुद्दे वाचून त्यांनी तो शब्द का घेतला आहे हे सहज लक्षात येते.

स्तिथप्रज्ञ हा शब्द त्रिपिटकात कोठेच आढळत नाही. आणि आक्षेपकानी हा मुद्दा लक्षात आणून दिल्यावर त्रिपिटकांत आढळणाऱ्या ठितचित्त (स्थितचित्त) या वेगळ्या अर्थाच्या शब्दाशी साळुंखे त्याचा संबंध जोडू पाहत आहेत.

स्थितप्रज्ञ हा शब्द भग्वद्गीतेत येतो. त्यामुळेच साळुंख्येनी त्याचा वापर केला आहे. तोही बुद्धासाठी.

स्तिथप्रज्ञ चा अर्थ स्थिर बुद्धीचा किंवा स्थिर ज्ञानाचा. अर्जुनाने वेगवेगळ्या शंका काढू नये म्हणून कृष्णाने त्याला स्थितप्रज्ञ होण्यास सांगितले. शंका किंवा प्रश्न उपस्थित होणार नाही. याचा अर्थ जाणून घेण्याची जिज्ञासा नाहीशी होणे बुद्धीची वाढ न होणे अश्या अर्थाचा तो शब्द आहे. अर्थातच ब्राह्मणी धर्माच्या कृष्णाच्या तोंडी शोभेल असेच ते शब्द आहेत.

याउलट बुद्धी, ज्ञान प्रवाही असणे, त्याच्या मनात जिज्ञासा निर्माण होणे हे बुद्धाला अपेक्षित आहे.त्यामुळे स्थितप्रज्ञ हा शब्द त्रिपिटकांत कोठेच आपणास आढळत नाही.

स्थितचित्त (ठितचित्त) हा शब्द त्रिपिटकात आढळतो. पण त्याचा अर्थ स्थितप्रज्ञ पेक्षा वेगळा आहे. त्रिपिटकातील ठितचित्त (स्थितचित्त) याचा अर्थ आहे स्थिर मनाचा (चंचल मन नसणे) आणि हाच अर्थ बौद्ध धम्माला अपेक्षित आहे.

ज्ञान/बुद्धी प्रवाही असणे ( म्हणजे स्थिर नसणे) व मन चंचल नसणे (म्हणजे स्थिर असणे) हेच बुद्ध धर्माला अपेक्षित आहे.
भग्वद्गीतेच सफाईदार पणे समर्थन करताना आ.ह.साळुंखे (त्यासाठी मान्यवरांची मते अर्धवट स्वरूपात सादर करत असताना)

★ भगवतगीता -

आ.ह. साळुंखे जसे स्थितप्रज्ञ च्या बाबतीत शब्दच्छल करतात. तसेच बुद्धाच्या चरित्रात भगवतगीतेवर जो भाग त्यांच्या पुस्तकात घेतला आहे त्यातही अन्य मान्यवरांची अर्धवट मते मांडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.

खरंतर त्यांनी भग्वद्गीतेवरचा भाग बुद्धाच्या चरित्रात घ्यायलाच नको होता.आणि घेतलाच तर त्यावर सविस्तर अशी चर्चा करायला पाहिजे होती. प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीवर त्यांनी स्वतः भाष्य केलेलं आहे. पण येथे ते कोणतंही भाष्य करत नाही. लेखकांची वाक्य अर्ध्यात तोडून आणि संदर्भ सोडून ते वाचकांसमोर ठेवतात व भग्वद्गीतेबद्दल लोकांच्या मनात अनुकूल भाव निर्माण होईल अश्या प्रकारे ते लोकांसमोर भग्वद्गीतेवरचा भाग मांडतात.

त्यांनी जी तीन लेखकांची अर्धी वाक्य आपल्यासमोर ठेवली आहेत तीचा सार म्हणजे भगवद्गीता बौद्ध विचारांच समर्थन करते व बौद्ध तत्वज्ञानाच्या फक्त नास्तिक (atheist) आणि निवृत्ती मार्गाला विरोध करते असा सार त्यांनी लोकांसमोर ठेवलेला आहे.

 हे मांडताना देखील कोसंबींची मधेच वाक्य तोडून अर्धवट स्वरूपात लोकांसमोर त्यांनी ती ठेवलेली आहेत.

साळुंखे यांचा यामागे शुद्ध हेतू दिसत नाही असंच कोणालाही जाणवेल. त्यांनी अश्या पद्धतीने बुद्धाच्या चरित्रात गीतेचे वर्णन करणं याचे कारण बौद्धांचा भग्वद्गीतेला विरोध त्यांना सौम्य करायचा आहे. त्यासाठी त्यांनी बाबासाहेबांची काही वाक्ये संदर्भ तोडून दिलेली आहेत. 

बाबासाहेब गीतेबद्दल काय म्हणतात ते पाहू :-

भग्वद्गीतेचे तत्वज्ञान स्मृतीच्या विरोधी नाही हे स्पष्ट करताना बाबासाहेब म्हणतात

" भग्वद्गीतेचे तत्वज्ञान स्मृतींच्या विरोधी आहे काय ? काही उदाहरणे देऊन या प्रश्नाचे निराकरण करता येईल"

त्यानंतर कृष्णाने गीतेत सांगितलेल्या तत्वज्ञानाचे सार त्याच्या चार तत्वात आहे असे म्हणून ते गीतेतील चातुर्वर्ण्य सिद्धांत आपल्यासमोर ठेवतात.

त्यानंतर बाबासाहेब म्हणतात :-

"गीतेची भूमिका हि अशी आहे. गीता आणि मनुस्मृतीत काय फरक आहे ? गीता हि मनुस्मृतीची छोटी आवृत्ती आहे. ज्यांना मनुस्मृती पासून दूर पळून गीतेचा आश्रय घ्यावयाचा आहे. त्यांनी एकतर गीता वाचली नसावी किंवा गीता हा मनुस्मृतीचा आत्मा आहे. याचा त्यांनी विचार केला नसावा..........स्मृती, वेद, आणि भगवद्गीता यांनी काढलेले सार एकच आहे. त्यांच्यामध्ये फरक करण्याचे वा निवड करण्याचे कारण नाही........हिंदू धर्मातील तत्वज्ञान मग ते मनुस्मृतीतील असो, वेदातील असो किंवा भग्वद्गीतेतील असो ते सर्व एकच आहे."

(हिंदू धर्माचे तत्वज्ञान)

बाबासाहेब आपल्या क्रान्ती-प्रतिक्रान्ति या ग्रंथात भग्वद्गीतेबद्दल पुढील मत व्यक्त करतात

" माझ्या मते भग्वद्गीतेत कुठल्याही प्रकारची ईश्वरवाणी नसून तीमध्ये प्रतिक्रान्तिच्या दार्शनिक तत्वज्ञानाचे धार्मिक आधारावर समर्थन करण्यात आले आहे. ........आणखी एका सिद्धांताचे प्रतिपादन गीतेत करण्यात आले आहे. ते म्हणजे चातुर्वरण्याचे तात्त्विक समर्थन.......भग्वद्गीतेतील तिसरा सिद्धांत कर्मयोगाला धर्माचे तात्त्विक आधार देऊन समर्थन देण्यात आले आहे. गीतेच्या शिकवणीतील सार कर्म मार्ग म्हणजे मोक्षप्राप्तीकरिता यज्ञयाग करणे होय. यज्ञयाग हे कर्ममार्गाचे आवश्यक अंग असल्याचे प्रतिपादन भग्वद्गीतेत करण्यात आले आहे. खरा कर्मयोग गीतेत लपविण्यात आला आहे. म्हणजेच मनुष्याला अंधविश्वासू बनविण्याचा हा प्रकार आहे.......प्रतिक्रान्तिची अधिकारीक पुस्तक ज्याला प्रतिक्रान्तिच बायबल म्हणतो त्या जैमिनीकृत 'पूर्वमीमांसेचे' प्रतिपादन करण्यात आले आहे......गीतेत दुसरे तिसरे काही नसून जैमिनीद्वारा प्रतिपादित कर्मकांडाच धार्मिक आधारावर समर्थन करून त्याला पुनर्जीवित करण्याचा हा प्रयत्न आहे........बौद्ध धर्माच्या जबरदस्त प्रभावापासून ब्राह्मणवादाचे रक्षण करण्यासाठीच भग्वद्गीतेची रचना करण्यात आली.

(क्रान्ती आणि प्रतिक्रान्ति)

कोसंबी गीतेबद्दल म्हणतात :-

"गीतेत ब्राह्मी स्थिती बौद्धांपासून घेतली हे वर सांगितले आहे. पण बौद्धांच्या काही तत्वांचा विपर्यास केला आहे.......आता प्रश्न येतो कि , जर बौद्धांच्या तत्वज्ञानाचा अशा रीतीने विपर्यास करण्यात येत होता. तर त्यांच्यावर एखाद्या बौद्ध पंडिताने खरमरीत उत्तर का दिले नाही ? भग्वद्गीतेच्या वेळी दिन्नागासारखे मोठमोठाले बौद्ध पंडित होते. असे असता गीतेसारख्या ग्रंथाला त्यांनी विरोधात्मक चार-सहा ओळी का लिहिल्या नाही ? एक तर हा ग्रंथ त्यावेळी अत्यंत अप्रसिद्ध असावा कारण शंकराचार्यापूर्वी पन्नास वर्षे लिहिलेल्या शांतीरक्षितांच्या तत्वसंग्रहात या गीतेचा मुळीच उल्लेख सापडत नाही. तेव्हा शांतिरक्षितापर्यंत हा ग्रंथ अप्रसिद्ध होता. असे समजण्यास हरकत नाही.प्रथमतः शंकराचार्यानी टीका लिहून या ग्रंथाला पुढे आणले.

(हिंदी संस्कृती आणि अहिंसा)

कोसंबीच्या मते बौद्धांच्या मतांचा गीतेने विपर्यास केला आहे. गीतेने सांख्यांच्याही तत्वज्ञानाचा विपर्यास केलेला आहे. बौद्ध शब्दांचा विपर्यास करण्याचे कारण प्रतिक्रान्ति बौद्धांच्या विरूद्ध करायची होती. स्थितप्रज्ञ हि देखील संकल्पना बौद्ध संकल्पनेच्या विरोधात होती. बौद्ध ग्रंथातील अनासक्ती आणि गीतेतील अनासक्ती यातही भेद आहे. गीतेच्या अनासक्ती चा अर्थ अर्जुनाने हत्या केली तरी कर्म फळ त्याला मिळणार नाही अश्या स्वरूपाचा सिद्धांत तो आहे. कर्म फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहा हा गीतेतील अनासक्तीचा अर्थ आहे. तर बौद्ध ग्रंथाच्या अनुसार कर्माचे फळ हे मिळतेच येथे गीतेसारखी अनासक्ती नाही तर इतर विषयांची आसक्ती (हाव) नसलेली अनासक्ती आहे.

★ साळुंखे यांच्या मते बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञेत नाकारलेला शिव व अवैदिक शिव हे एक नव्हेत. बाबासाहेबांनी नाकारलेला ब्रह्मा व अवैदिक ब्रह्मा एक नव्हेत. (सर्वोत्तम भूमिपुत्र : आक्षेप p.120)

ब्राह्मणी प्रतिकांच समर्थन करताना आ.ह.साळुंखे (ह्याच तर्काने विष्णूसहित हिंदू धर्मातील ३३ कोटी देवतांच समर्थन करता येऊ शकत आणि तसे ते आ.ह. साळुंखे यांनी केलेलं आहे)

खरतर ह्यावर लिहण्याची गरज आहे अस मला वाटत नाही कारण वाचक सुज्ञ आहेत त्यांनाही हे साळुंखे यांचं मत चुकीचेच वाटेल यात शंका नाही. तरीहि काही वाचक याला फसण्याची शक्यता आहे.

हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही. अशी तिसरी प्रतिज्ञा बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे प्रश्न वैदिक असो किंवा अवैदिक असो हिंदू धर्मातील कोणत्याही देवतेला मानणार नाही अशी स्पष्ट प्रतिज्ञा ती आहे.

तरीही साळुंखे याबाबतीत शब्दच्छल करतील. तसा प्रयत्न त्यांनी केलेल सुद्धा आहे. विशाल अश्या बौद्ध साहित्याच्या कोपर्यातून आधार मिळवायचा ते प्रयत्न करतायेत.

बाबासाहेब हिंदू प्रतकांबद्दल बोलताना म्हणतात.

" मी माहात्म्यला ठामपणे सांगू इच्छितो कि माझ्या मनातील घृणा आणि तुच्छता हि केवळ हिंदूंच्या किंवा हिंदुत्वाच्या अपयशामुळे निर्माण झालेली नाही. मला हिंदू आणि हिंदुत्वाचा तिरस्कार वाटतो कारण माझी खात्री पटलेली आहे कि ते चुकीचे आदर्श कवटाळतात आणि चुकीचे सामाजिक जीवन जगतात. हिंदू आणि हिंदुत्वाने स्वीकारलेल्या सामाजिक वर्तनातील त्रुटींशी माझे भांडण नाही. माझा विरोध मूलभूत आहे. त्यांच्या आदर्शांशीच माझा संघर्ष आहे."

"मला काठमांडू येथील पशुपती नाथाच्या मंदिरात जाऊ दिले नाह, असे खोटेच छापण्यात आले. मी कोणत्याच हिंदू मंदिरात जात नाही. मला १०० वेळा प्रार्थना केली असती तरी मी त्या देवळात जाणे शक्य नव्हते. .......मी बुद्धाशिवाय कोणाला शरण जाणार नाही.(२४ नव्हे. १९५६)

"हिंदूंचे देव म्हणजे राजांची कुलदैवते त्यांचे पराक्रम म्हणजे राजांचे पौरोहित्य मिळवण्यासाठी ब्राह्मणांनि रचलेली त्यांच्या खुशामतीची पुराणे. इंद्र कृष्ण हे काय देव" ?(२५नव्हे १९५६)

"असा एकतरी देव दाखवा कि ज्याचे निष्कलंक चरित्र आजच्या माणसाला आदर्शवत आणि अनुकरणीय वाटेल" (२५नव्हे १९५६)

" बुद्ध धर्माची दीक्षा घेतल्यावर तुम्हाला हिंदू धर्मातील मते आणि दैवते बुद्ध धर्मात आणता येणार नाहीत. घरात खंडोबा व बाहेर बुद्ध चालणार नाही."(१४ जाने १९५१)

"बारा भाईंची खिचडी करून चालायचे नाही.फक्त बुद्ध धर्मच पाळा इतर काही नाही." (१४ जाने १९५१)

"त्या काळात चोखोबाला आपल्या जीवनात काही करता आले नाही. त्या चोखोबा बद्दल आपण आस्था बाळगणे हितावह नाही.......तुम्ही बांधलेल्या देवळात बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करा." (८ मे १९५४.देहूरोड)

एव्हढे संदर्भ मला वाटतंय आ.ह.साळुंखे यांचा खोटारडे पणा सिद्ध करण्यास पुरेशा आहेत.

कदाचित ते अ. भा. साईभक्त संमेलनातील भाषणाचे अर्धवट संदर्भ देत बाबासाहेबाना कदाचित साईभक्त किंवा साई अनुयायी देखील घोषित करतील. 

★ रामाची आणि बुद्धाची तुलना. हनुमान बहुजनांचा नायक आणि रावण मात्र मिथक

रामायण खरेच घडले का? रामायणातील पात्र खरेच अस्तित्वात होते का? खरंतर हा चर्चेचा विषय आहे. बहुतांश अभ्यासक रामायणाला काल्पनिक मानतात. आ.ह. साळुंखे ज्या दशरथ जातकाचा हवाला देत मत मांडतायेत ते एक जातक आहे. जातक कथांचा उपयोग त्याची निर्मिती लोकांच प्रबोधन व्हावं या हेतूने झालेली आहे.

काही जातक कथेत तर बोधिसत्व प्राण्यांच्या रुपात आलेला आहे. दशरथ जातक कथेत राम बोधिसत्व म्हणून येतो हि सुद्धा तशीच एक कल्पना आहे. किंवा लंकावतार सूत्रात रावण बुद्धाशी तत्वज्ञानात्मक चर्चा करतो हि सुद्धा एक कल्पनाच आहे.

अनेक अभ्यासकांनी रामायणातील विचार बदलता यावा यासाठी जैनानी आणि बौद्धांनी अनेक रामायणाच्या कल्पना मांडल्या. असे मत मांडलेलं आहे.

आ.ह. साळुंखे आर्य-अनार्य संघर्ष मांडतात. पण रामायनातला संघर्ष ते आर्य अनार्य संघर्ष मानत नाहीत.

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी रामायण मधील संघर्ष हा आर्य-अनार्य संघर्ष आहे असे म्हटलेले आहे.

पेरियार रामस्वामी यांनी रामायणाला काल्पनिक मानले असले तरी त्यात आर्य अनार्य अशी सांस्कृतिक संघर्षाची मांडणी आहे असे म्हणतात.

प्रा. अरुण कांबळे सुद्धा काल्पनिक असला तरी रामायणातला संघर्ष आर्य-अनार्य सांस्कृतिक संघर्ष असल्याचे मानतात.

येथे मात्र साळुंखे रामाला आर्य मानायला तयार नाहीत. त्याच कारण काय ?

रामायण हे काव्य काल्पनिक आहे किंवा नाही हे सांगता येत नाही. कारण रामायणाशी संबधित गोष्टी आपणाला गुप्त कालखंडानंतर पाहायला मिळतात.

कदाचित रामायण आधी अप्रसिद्ध असल्यामुळे त्याचे पुरावे गुप्तकाळा आगोदर मिळत नसावेत. 

पण हे खरे आहे कि राम आर्याचं प्रतिनिधित्व करताना दिसतो. व रावण अनार्य लोकांच प्रतिनिधित्व करताना दिसतो.

बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार झाल्यावर बौद्ध धर्मात आर्यानी आणि अनार्यानी प्रवेश केला. त्याचबरोबर त्यानी आपली दैवत देखील दुय्यम स्वरूपात बुद्ध धर्मात आणली. त्यामुळेच आर्याचे इंद्र ब्रह्मा महेश, राम व अनार्याचे सम्राट बळी , रावण यांचे उल्लेख बौद्ध ग्रंथात पाहायला मिळतात

 महत्वाचे म्हणजे बौद्ध ग्रंथात आर्य राम व अनार्य रावण झगडताना दिसत नाही. त्यांच्या कथा स्वतंत्र पद्धतीने मांडल्या गेल्या आहेत. त्याच कारण हेच बौद्ध धर्माने आर्य-अनार्य संघर्ष मिटवला. व या प्रतिकांच्या माध्यमातून बुद्धांचा संदेश आर्य-अनार्य लोकांमध्ये पोहचला जावा म्हणून आर्य-अनार्याच्या प्रतिनिधीनी निर्माण केलेल्या या कथा आहेत.

दशरथ जातक खरं मानलं तर त्यात राम- सीता सहोदर भाऊ बहीण होते हा उल्लेख हि खरा मानावा लागेल मग. का फक्त आपल्या सोईनुसारच गोष्टी स्विकारायच्या ?

आ.ह. साळुंखे या कथा काव्याच्या आधारावर रामाला सत्य मानतात परंतु रावणाला ते एक मिथक मानतात त्याचे कारण काय ? रावणाच्या चरित्रापुढे रामाचे चरित्र फिके पडते म्हणून कि काय ? शेपटी असलेल्या हनुमानाला ते बहुजनांचा नायक मानतात पण दशानन ( दहा डोक्याची बुद्धी) असलेल्या रावणाला मात्र ते एक कल्पना समजतात

खरंतर या गोष्टी साळुंख्यानी स्वतंत्रपणे मांडल्या असत्या तरी हरकत नव्हती. प्रश्न हा आहे कि या सर्व भानगडी बुद्धाच्या चरित्रात का घुसडलेल्या आहेत ? 

कारण साळुंखे यांचा अजेंडा ठरलेला आहे. त्यांना हिंदू धर्मातील प्रतिकांच पुनर्जीवन करायचं आहे. त्यासाठी त्यांनी हि निर्माण केली आहे एक वेगळ्या प्रकारची प्रतीक(क्रान्ती).

1 टिप्पणी:

  1. एकदम योग्य पद्धतीने मांडणी केली आहे. लोकांना between the lines देखील कळले पाहीजे.

    उत्तर द्या

Comments