१ जानेवारी १८१८
- Get link
- X
- Other Apps
शुक्रवार, १९ जानेवारी, २०१८
१ जानेवारी १८१८
१ जानेवारी १८१८ रोजी इंग्रज आणि दुसरे बाजीराव पेशवे यांच्यात भीमा नदीच्या तीरावर वसलेल्या कोरेगाव येथे झालेली लढाई आणि या लढाईत महारांनी गाजविलेले शौर्य ही संपूर्ण महार जातीला अभिमानास्पद घटना आहे. या महार सैनिकांनी त्यांच्यापेक्षा अनेक पटीने जास्त असलेल्या पेशव्यांच्या लष्करास आपल्या तलवारीचे पाणी पाजून त्यांचा धुव्वा उडविला. नोव्हेंबर १८१७ मध्ये पेशव्यांच्या सैन्याने पुण्यातील इंग्रज वकीलातीवर हल्ला केला. कर्नल 'बर' याने इंग्रज वकीलातीचे संरक्षण करण्याचा अटोकाट प्रयत्न केला. परंतु पेशव्यांच्या सैन्याने पुन्हा इंग्रज वकीलातीवर हल्ला केला. त्यामुळे कर्नल बरं हतबल झाला. याचवेळी सेकंड बटालियन फर्स्ट रेजिमेंट बाँबे नेटिव्ह इन्फ्रान्ट्रीचा मुक्काम पुण्याच्या वायव्येस ३८ मैलांवर असलेल्या शिरूर गावात होता. तिचा प्रमुख कॅप्टन स्टोटन याला बोलाविले गेले. त्यानुसार स्टोटन हा ३१ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता सेकंड बटालियनला घेऊन शिरूरहुन पुण्याकडे निघाला. या बटालियनमध्ये बहुसंख्य सैनिक महार होते. कॅप्टन स्टोटन च्या लष्करात ५०० पायदळ, ३०० घोडदळ, ५ इंग्रज अधिकारी पाऊंडर तोफा व त्या चालविणारे २४ ब्रिटिश सैनिक एवढा लवाजमा होता.२५ मैलांचा रात्रभर प्रवास केल्यानंतर ही बटालियन पहाटे भीमा नदीच्या तीरावर आली. तेव्हा पेशव्यांचे प्रचंड सैन्य (पेशव्यांच्या सैन्यात २५ हजार सैनिक व ५ हजार घोडेस्वार होते) नदीच्या दुसऱ्या तीरावर लढाईस सज्ज असलेले स्टोटनला दिसले. पेशव्यांच्या सैन्याशी लढता यावे म्हणून स्टोटनने कोरेगावचा आश्रय घेतला. स्टोटनचे सैन्य दिसताच पेशवा बाजीराव दुसरा याने सेनापती बापू गोखले यांना इंग्रजांवर हल्ला करण्यास सांगितले. अशा रीतीने १ जानेवारी १८१८ रोजी सकाळी कोरेगावच्या लढाईस सुरुवात झाली. या लढाईत महार सैनिकांनी मोठ्या हिंमतीने लढून पेशव्यांचा सैन्याचा पराभव केला. रात्री ९ वाजता पेशव्यांच्या सैन्याने रणांगणातून पळ काढला , तेव्हा भीमा नदीपर्यंत इंग्रज सैनिकांनी त्याचा पाठलाग केला. या लढाईत इंग्रजांचे २७५ सैनिक ठार झाले तर पेशव्यांचे ६०० च्या वर सैनिक ठार झाले. या लढाईत ज्या २२ महार वीरांनी विशेष पराक्रम गाजवला व यशश्री खेचून आणली त्यांचे कोरेगाव येथे भव्य स्मारक उभारून तेथील विजयस्तंभावर त्यांची नावे ब्रिटिशांनी अजरामर केली आहेत. १९४२ मध्ये दुसर्या महार बटालियन लेफ्टीनंट इ. इ. एल. मोर्टलमैन्स यांनी कॅपचा बिल्ला म्हणून भीमा कोरेगाव स्तंभाची प्रतिकृती असलेल्या चिन्हाची निवड केली. स्वातंत्र्य मिळाल्यावर ३ फेब्रुवारी १९७० रोजी राष्ट्रपती व्ही व्ही गिरी यांच्या हस्ते महार रेजिमेंटला ध्वज अर्पण करून सन्मानित केले गेले. राष्ट्रपतीच्या हस्ते ध्वज ग्रहण करणारी देशातील ही पहिलीच रेजिमेंट होय (देश स्वातंत्र्य झाल्यानंतरची महार रेजिमेंट ची शौर्यगाथा वाचण्यासाठी शी.भा. गायसमुद्रे यांच महार एक शूर जात हे पुस्तक वाचा) कर्नल टॉड याने कोरगावच्या लढाईचे वर्णन 'थर्मोपिलेची लढाई' अशा गौरवपूर्ण शब्दात केले आहे. कोरेगावची लढाई व त्यामध्ये इंग्रजांना मिळालेला विजय ही घटना इंग्रजांच्या दृष्टीने फार महत्वाची ठरली. या लढाईत महार सैनिकांनी दाखवलेल्या शौर्यामुळे पेशव्यांच्या लष्कराचे नितीधेर्य खचले गेले. त्यामुळे पेशव्यांचे लष्कर कधीच सावरू शकले नाही. त्यांचे अवसान कायमचे गळाले, म्हणून यानंतर पेशव्याला आपल्या संरक्षणासाठी सतत भ्रमंती करावी लागली. इ.स.१८१८ साली ब्रिटिश सेनापती स्मिथच्या नेतृत्वाखाली महार सैनिकांनी सोलापूर व आष्टीच्या लढाईत पेशव्यांच्या सैन्याचा पुन्हा धुव्वा उडवला. त्यामुळे तर पेशव्याच्या सैन्याने फारच दहशत खाल्ली, म्हणून लवकरच पेशव्याचा कायमचा पराभव होऊन पेशवाईचा नाश झाला.
(शिवकाळ व पेशवाईतील महारांचा इतिहास - डॉ. अनिल कठारे/ महार एक शूर जात - शी. भा. गायसमुद्रे)
महारांच्या इतिहासात भीमकोरेगावच्या लढाईला फार महत्व दिलं गेलं आहे. ते फक्त महार समाजातील लेखकांनीच दिलं असं नव्हे तर ब्रिटिश लेखकांनी देखील त्याची दखल घेतलेली आहे.(उच्चवर्णीय लेखकांकडून अशी अपेक्षा करणं चुकीचं ठरेल)
१९३३-३८ च्या काळात लिहिला गेलेल्या 'महार फोक' ह्या ग्रंथात अलेक्झांडर रोबर्टसन पुढील मत व्यक्त करतात -
"ज्यांनी आपले सारे आयुष्य भारताच्या सेवेत रणांगणावर वेचले आहे अशा लोकांनी भारतीय सेनेची जी प्रशंसा केली त्यात मुंबई सेनेतील महार शिपाई, मानकरी आहेत, जेव्हा शिपायात व वाहन जनावरांत रोगराई फार व अन्नधान्याचे वाटप फार कमी प्रमाणात असेल तेव्हा त्यांना लॉंगमार्चचा त्रास सहन करावा लागत असे काय ? त्यांच्या परीक्षेचा क्षण आला होता काय ? त्यांना शत्रूने वेढा दिला असताना, शत्रूने त्यांना ताब्यात घेऊन युद्धबंदी बनवल्यावर व आमच्या युरोपिअन बांधवांना पुरेसे अन्न मिळावे म्हणून स्वतः कमी खात असताना तसेच त्यांच्याच आपल्या रणमैदानावर खुल्या युद्धाला तोंड देताना, किल्ल्यावर तोफखाना डागताना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱयांना व युरोपियन बांधवांना त्यांच्याबद्दल अभिमान वाटेल अशीच त्यांची कृती घडली काय ? त्यावेळी शिरूरहुन किरकीपर्यंत ६०० शिपायांनी हजारो शत्रूंच्या विरोधामुळे केलेल्या पीछेहाटीने १ जानेवारी १८१८ ला कोरेगाव येथे केलेल्या युद्धातील प्राणहूतीची स्मृती जेव्हा ताजीतवानी होते तेव्हा महारांची छाती भरून येते ! पेशव्यांच्या प्रचंड सेनेने ३०० अस्पृश्यांच्या तुकडीवर छापा घातला तेव्हा केवळ दोन डझन बंदूकधारी व काही युरोपियन अधिकारी हेच ते शिल्लक होते. समोरासमोर सतत बारातास लढाई चालली ! ६०० लोकांवर दोन्ही बाजूने घेरण्यात आले व काहींना जखमी करण्यात आले. व काहींना ठार करण्यात आले. तथापि छोटी ब्रिटिश सेनाच विजयी झाली. पुणे, अहमदनगरच्यावरून जाणाऱ्या भीमा नदीच्या पवित्र किनाऱ्यावर धारातीर्थी पतन पावलेल्या शूर महारांचे स्मारक बांधले आहे. ते स्मारक महारांचेच आहे. हे नावाचे शेवटी नाक आहे ह्यावरून हे ओळखता येईल."
म्हणजे ४० च्या दशकात सुद्धा ब्रिटिश लेखकाकडून या युद्धाची दखल घेतली गेली. फक्त दखलच नव्हे तर लेखक ब्रिटिशांना पुढे एक इशारा देताना दिसतो. १८९२ नंतर महार सैनिकांची भरती इंग्रजानी बंद केली होती ही किती घोडचूक आहे हे सांगतानाच पुन्हा कोरेगाव युद्धाचा दाखला देत एक प्रकारे सावधानतेचा इशाराच तो ब्रिटिशांना देत आहे.
अलेक्झांडर रोबर्टसन म्हणतो - "महारांना राजकीय महत्व नाही असे मत वारंवार ऐकण्यात येते. असे मत बनविणाऱ्या माणसाला कोरेगावच्या युद्ध इतिहासाचे स्मरण नाही असे म्हणावे लागेल. अशा मनाची कमजोरी असणाऱ्या अधिकाऱ्यात हे साम्राज्य टिकवून धरण्याची पात्रता नाही असेच म्हणावे लागेल"
ज्या महार सैनिकांच्या ऐतिहासिक युद्धामुळे भारतात पेशवाई संपून ब्रिटिश साम्राज्याचा उदय झाला. त्याच महार सैनिकांमुळे ब्रिटिश साम्राज्याचा अस्त व्हायला वेळ लागणार नाही असाच तो इशारा आहे.
महार पेशव्यांचा विरोधात का लढले ?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिमांसकट अठरापगड जातीचे सैनिक होते. महार सुद्धा त्यात होते.
वेलंग येथील सिदनाक महार -
निजामशाहित लखुजी जाधव, मालोजी भोसले यांचे इतरांप्रमाणेच दुसरा सिदनाक महार हे सुद्धा सहकारी होते.
सिदनाक महाराचा नातू तिसरा सिदनाक महार उर्फ सिद्धनाथ बाजी होय. याच सिदनाक महाराने छत्रपती शिवाजी महाराजांना वाई प्रांतात लष्करी मदत केली. जावळीच्या चंद्रराव मोऱ्याचा पाडावं करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजाना मदत केली. अफझल खान सैन्याच्या वधावेळी अफजल खानाच्या सैन्याविरोधात जे सरदार लढले त्यापैकी सिदनाक महार एक होता. पुढे छत्रपती शाहू महाराजांनी तिसरा सिदनाक महार याला त्याच्या कामगिरी साठी कळंबी हे गाव इनाम म्हणून दिले. याच सिदनाक महाराचा नातू चौथा सिदनाक खर्ड्याच्या लढाईत मराठ्यांच्या बाजूने युद्धात उतरला.पण त्याला त्या मैदानावर तळ पडलेला असताना जातिभेदाचा सामना करावा लागला.
"शाहू महाराज गेल्यानंतर मराठेशाही संपली गेली. शाहू हयात असे पर्यंत तरी पेशव्यांवर त्यांचा काही प्रमाणात अंकुश होता. पण त्यानंतरचे छत्रपती दुबळे निघाल्याने सर्व सत्ता पेशव्यांच्या हाती एकवटली. या घटनेचे भावी काळात मराठी राज्यावर अनिष्ट परिणाम झाले"(पानिपत १७६१ - त्र्य. शं. शेजवलकर, दुसर्या आवृत्तीविषयी...- माधव रां. कंटक)
शाहू महाराजांनंतर मराठे शाही संपून पेशवाईचा उदय झालेला होता. त्याच बरोबर अनेक बंधनांचा सामना महारांना करावा लागला. मराठे शाहित अस्पृश्याना न करावी लागणारी वेठबिगारी पुन्हा सुरू करण्यात आली.
पेशवाई व महार समाज -
शारदा देशमुख यांनी अस्पृश्यतेच्या संदर्भात म्हटले - "पेशवाईत आचारधर्माचे नुसते स्तोम माजवल्याने माणुसकीला काळिमा फासणारे आचार धर्माच्या नावाखाली बोकाळले होते. अंत्यज वर्गाला स्पर्श करणेही पाप मानले जात असे. एवढेच नव्हे तर त्यांच्याशी बोलणे किंवा सावली अंगावर पडू देणे म्हणजे अब्राह्मण्य ! अश्या अस्पृश्याना देवळात मज्जाव, पाणवठ्यावर मज्जाव, शाळेत मज्जाव अश्या कोट्यवधी हिंदू बांधवांना हिंदू धर्मापासून वंचित व हिंदू समाजापासून बहिष्कृत केलेले असे"
जी.एस.घुर्ये हे caste and race in india या ग्रंथात अस्पृशेबद्दल लिहितात. "In the maratha country a mahar, one of the untouchables might not spit on the road lest a purecaste hindu should be polluted by touching it with his foot but had to carry an earthern pot, hung from his neck, in which to spit. Further he had to drag a thorny branch with him, to wipe out his footprints and to lie at a distance prestate on the ground if a brahmin passed by, so that foul shadow might not defile the holy brahmin"
१८६९ साली ना.वि.जोशी यांच्या पुणे वर्णनात अस्पृश्यता संबंधी पुढील उल्लेख आढळतात -
"पेशवे काळात पुण्यातील ब्राह्मणास फार मान आला होता व सोवळ्या ओवळ्याचा आचारविचार फारच वाढला होता. महार, मांग, चांभार, धेड, इत्यादी लोकांस रस्त्याने थुंकण्याचा देखील हुकूम नव्हता. त्यांनी कमरेस मडकी बांधून फिरावे. कोणी ब्राह्मण रस्त्यात भेटला तर लागलेच खाली बसावे, कारण आपली सावली त्याच्या अंगावर पडता कामा नये असे त्यांचे हाल होते."
"बाजीराव दुसरे त्या समयी मांग अथवा महार ह्यातून कोणी तालीमखान्यापुढून गेला असता गुलतेकडीच्या मैदानात त्याच्या शिराचा चेंडू आणि तरवारीचा दांडू करून खेळत होते"
"त्या काळात महार, मांगास किल्ला आणि इमारतीच्या पायात घालत असत. किल्ल्याच्या पायात घालत असता महारमांगास पांघरण्याची सोय नव्हती. जर महार, मांग पांघरतील तर धर्म भ्रष्ट होईल असे म्हणून त्यास बांधून मारीत. उच्च वर्णातील लोकांचा अपराध केला असता मांगाचे किंवा महाराचे डोके मारीत होते. अस्पृश्याना बाजारात फिरण्याची मोकळीक नव्हती"
राजाराम शास्त्री भागवत यांनी 'मराठ्यांसबंधाने चार उदगार खंड १' या ग्रंथात अस्पृश्यतेबद्दल म्हटले -
"ब्राह्मणांचे जातीभेदस्तोम वाढले. खरोखर पेशवाईपासून रस्त्यावर थुंकल्यास रस्ता बाटेल म्हणून गळ्यात थुंकण्यासाठी एक मडके बांधून अतिशूद्रांनी शहरातून फिरावे, हा हुकूम पाहिल्याने फिरविला पेशव्यांनी. अतिशूद्राच्या थुंकीने पुण्यापत्तनास विटाळ होऊ नये म्हणून त्यांच्याच गळ्यात थुंकण्यासाठी पिकदाणीप्रमाणे मडकी बांधण्याचा हुकूम फर्माविला"
"पेशवे काळात महारांवर फार मोठयाप्रमाणात अन्याय, अत्याचार करण्यात आले. परंतु त्याची दाद मागण्याची मुभा नव्हती. ब्रिटिश निरीक्षकांनी म्हटले की सकाळी ९ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ३ वाजल्यानंतर अस्पृश्याना पुणे शहरात फिरण्याची परवानगी नव्हती."
डॉ. खानापूरकर यांनी 'नवा महाराष्ट्र भाग - २,पृ ११८,वर्ष १९४८ अस्पृश्यतेच्या संदर्भात म्हटले -
"सर्व अस्पृश्यत जास्तीत जास्त हिंदू समाजाकडून हाल व अपमान झाले असतील तर ते महारांचे, पेशवाईत त्यांना गळ्यात मडके बांधून फिरण्याची सक्ती होती. गावात ब्राह्मण समोर दिसला तर तो महाराच्या सावलीने अपवित्र होऊ नये म्हणून यांना जमिनीवर पालथे पडण्याचा हुकूम होता. जमिनीवर पडलेल्या पावलांच्या खुणांनी ब्राह्मण अपवित्र होऊ नये म्हणून यांना काटेरी झुडूप स्वतःच्या मागे घेऊन हिंडावे लागे व झुडुपाने आपल्या पावलांचा भाग पुसून टाकावा लागे"
अलेक्झांडर रोबर्टसन हे पेशवेकाळाच्या अस्पृश्यते संबंधात लिहितात-
"एक काळ असा होता की जेव्हा महारांच्या गळ्यात एक धागा व त्याला बांधून समोर थुंकण्यासाठी एक गाडगे व पाठीमागे आलूबुखार झाडाची एक फांदी बांधत. महारांच्या पावलांची चिन्हे मातीवर पडली असल्यास ती पुसून टाकण्यासाठी म्हणून झाडू बांधलेला असे."
अश्या प्रकारची क्रूर वागणूक पेशवाईत अस्पृश्याना मिळत होती. तर मग अस्पृश्यानी पेशवाईच्या विरोधात तलवार उचलली असेल तर यात चूक काय ? उलट ही गोष्ट न्यायाचीच आहे.
अस्पृश्यनाच अपमानस्पद वागणूक मिळत नसून इतर ब्राह्मणेतरांना देखील अपमानास्पद वागणूक मिळत होती. यामुळे पेशव्यांच्या विरोधात लढण्यात काही ब्राह्मणेतर लोकही होते.
सरदारांचा उल्लेख पेशवे पुढील प्रमाणे करत -
" श्रीमंताचेही चित्तात आले की , शूद्र माजला . बरे, चिंता काय आहे ....."
पेशव्यांसाठी त्यांचे सरदार हे शुद्रच होते.
"ब्राह्मणांनी दोन्ही बाजूने निर्या घालायच्या . ब्राह्मणेतरानी फक्त मागच्या बाजूने निर्या घालायच्या. भंडारी लोकांनी ढुंगणाला रुमाल लावून त्याचा मोठा भाग ढुंगनाभोवती गुंडाळवायचा असा नियम होता"
"सोनारानी आपण देवाज्ञ ब्राह्मण आहोत असं म्हणून आपली धर्मकृत्य वेदोक्त पद्धतीने केली म्हणून त्यांची जिभा कापण्याचा हुकूम पेशव्यांनी केला" - (डॉ. आंबेडकर)
अश्याप्रकारे अस्पृश्यांचे पेशवाईत तीव्र हाल होत होतेच. पण ब्राह्मनेतरांचेही हाल होत होते.
पेशवाईच्या अंताचे समर्थन -
जातीचे आरोहण (caste ascendence) या सदराखाली इतिहास संशोधक रानडे म्हणतात -
" ब्राह्मणांना पेशवाईत असे वाटू लागले की, आता आपणच खरेखुरे राजे आहोत. त्यांना स्वतंत्र सवलती भोगायला मिळू लागल्या. अनेक बाबतीत इतरांना लागू असलेल्या कायद्याची बंधने ब्राह्मणांना लागेनाशी झाली. पेशव्यांच्या दरबारातील कोकणस्थ ब्राह्मण कारकुनांची मिजास तर औरच वाढली. त्यांना इतमामास योग्य असा भरपूर पगार मिळे. त्यांच्या मालावर आयात निर्यातीच्या बाबतीत जकात माफ होत असे. कल्याण प्रांतातील व मावळ्यातील ब्राह्मणांच्या जमिनीवर इतर जातीच्या मानाने निमपेक्षाही कमी कर पेशवा सरकारने ठेविला होता. फौजदारी न्यायालयात ब्राह्मणांच्या बाबतीत कायदेशीर दंड व शिक्षा शक्य तितकी मऊ केली जात होती. किल्ल्यातील बंदिखान्यात इतरांपेक्षा ब्राह्मणांना उदार वागणूक मिळत असे. आणखी असे की, सरकार दरबार ब्राह्मणांना फार मोठा दानधर्म सरकारी खजिन्यातून करत असे. विद्या असो वा नसो, ब्राह्मणांकरता दक्षिणा व जेवण यांची भरपूर तरतूद सरकारने केली. त्यामुळे पुणे शहर हे ब्राह्मण भिखार्यांचे मोठे जंगी केंद्रच बनले. तीस ते चाळीस हजार ब्राह्मण ओळीने कित्येक दिवस पक्वनांची भोजने झोडीत राहत असत. या व अश्या प्रकारच्या गोष्टींमुळे ब्राह्मणशाहीचे वर्चस्व अठराव्या शतकाच्या शेवटच्या भागात पराकोटीस पोहोचले आणि हेच वर्चस्व अवनतीस कारण झाले"
शेजवलकर पेशवाईच्या अंता संदर्भात म्हणतात.-
"सर्वच क्षेत्रात मराठ्यांहून श्रेष्ठ असलेल्या इंग्रजांनी पेशवाई बुडवून दुसऱ्या बाजीरावाला देशोधडीला लावले तेव्हा एकाने तरी दुःखाने अश्रु ढाळले असतील असे वाटत नाही. उलट बहुतेकांनी, या चांडाळांच्या तावडीतून सुटलो म्हणून सुटकेचा निश्वास सोडला! समता व बंधुता म्हणजेच ब्राह्मण्याचा लोप पेशवाईच्या अखेरीस झाल्याचा हा दुष्परिणाम !"
डॉ. जयसिंगराव पवार या संबंधाने म्हणतात -
"शनिवारवाड्यावर युनियन जॅक चढल्यावर मराठी माणसांनी निश्वास सोडल्यास नवल नव्हते. पेशवाई बुडल्याचे खरे दुःख दक्षिणा व ब्राह्मण भोजने यावर तुष्ट झालेल्या ब्राह्मण वर्गास झाले. पण मुंबईच्या एलफिन्स्टन या गव्हर्नरने ब्राह्मणांची संतर्पणे पुढे चालू राहतील असे आश्वासन दिल्यामुळे त्यांनाही पेशवाई बुडल्याचे दुःख फारसे वाटेनासे झाले"
अश्याप्रकारे एक वर्ग सोडला तर पेशवाई बुडल्याचे दुःख कोणालाही झाले नाही. या उलट बहुसंख्य लोकांना पेशवाई संपल्याचा एकप्रकारे आनंदच झाला असावा
देशद्रोही कोण ?
ज्यांना पेशवाई बुडाल्याचे दुःख झाले त्यांचाच आताच्या वंशजांनी सर्वाना देशद्रोही देशभक्तीचे सर्टिफिकेट वाटायचा मक्ता घेतलेला आहे. पेशव्यांच्या विरोधात लढले म्हणून या "देशभक्तांनी ?" महारांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न केला आहे.
इंग्रज येण्याअगोदर येथे देश नावाची कोणतीही संकल्पना नव्हती. प्रत्येक राजे आपला राज्यविस्तार करण्यासाठी लढत असत. या देशाला कोणतीही अधिकृत सीमारेषा नव्हती. इंग्रज या देशात आले तेव्हा सुद्धा येथील राजे एकमेकांशी लढत होते. टिपू सुलतानाच्या विरोधात इंग्रजांना मदत करणारे पेशवे होते.
दक्षिणेत फ्रेंचांचा वरचष्मा आपल्या एकट्याच्या सामर्थ्याने उतरेना तेव्हा पेशव्याने इंग्रजांची मदत घेतली आणि त्यांच्या मदतीने जंजिऱ्याचा शिद्दी हा शंभर वर्षाचा शत्रू उखडण्याऐवजी इंग्रजांवर दहशत राखणारा तुळाजी आंग्रे त्याने नाहीसा केला. येनेकरून इंग्रज अकुतोभय होऊन संबंध पश्चिम किनाऱ्यावर शेर झाले. व त्यांनी निःशंक मनाने पुढे कलकत्त्यास जाऊन बंगालचा सुभा, लुटुपुटूच्या लढाईने व खोट्या कागदाच्या कारस्थानाने न समजता घशात पाडून घेतला. पेशव्यांच्या नैतिक पाठींबा असल्यामुळेच ही गोष्ट घडू शकली, हे अजून हिंदी इतिहासकारांच्या नजरेत भरलेलं नाही. इंग्रजांचे बांगल्यातील कार्य बिनसेल म्हणून त्यांना मदत करण्यासाठीच की काय, पेशव्याने बंगाल सुभ्याची चौथाई वसूल करणारे नागपूरकर भोसले बंधू इकडे महाराष्ट्रात बोलावून वर्षभर माशा मारीत ठेवले व क्लाइव्हचे कार्य भोसल्यांच्या गैरहजेरीत यथास्थित पार पाडू दिले. पेशव्यांच्या अकथीत राजकारणाची ही बाजू मराठ्यांच्या इतिहासकारांनी साळसूदपणे आपल्या लिखाणात सदैव गाळत आणलेली आहे. (पानिपत १७६१ - त्र्यं. शं. शेजवलकर)
अस्पृश्यानी पेशव्यांशी द्रोह केला असेलच तर तो अन्यायाच्या विरोधात केलेला द्रोह होता. पण पेशव्यांनी केलेला द्रोह मातीशी देशाशी केलेला द्रोह नव्हता काय ?
- Get link
- X
- Other Apps


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा