श्रीनाथ म्हस्कोबा
श्रीनाथ म्हस्कोबा
श्री क्षेत्र वीर येथे काशिखंडाचे श्री काळभैरव श्रीनाथ म्हस्कोबा महाराज यांचे जागृत देवस्थान आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मुख्य दरवाज्याने आत प्रवेश केल्यावर पादुका व श्रीनाथांचे वाहन (अश्व) घोडा आहे. यात्रा काळात पादुका मंदिराचे शिखरापासून मुख्य मंदिराच्या कळसापर्यंत फेटा बांधतात. त्याच्यापुढे कासव आहे. कासवावर देवापुढे उभे राहून भक्तगण नवस बोलतात.
आतील मंदिराभोवती श्रीनाथांचे मानकरी श्री. शिंगाडे, बुरंगले, व्हटकर, ढवाण, तरडे, राऊत यांना यात्राकाळात व इतर वेळी राहण्यासाठी ओवर्या आहेत.
मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना श्रीनाथांचे वाहन अश्व आहे. अश्वाच्या समोर तुकाईदेवीची मूर्ती आहे. तेथून आत गर्भागृहात श्रीनाथ म्हस्कोबा महाराज, आई जोगेश्वरी व स्वयंभू काळभैरवनाथ महाराज यांच्या मूर्ती आहेत. देवाचे दर्शन घ्यावयाचे झाल्यास प्रथम पादुका, नंतर तुकाई व गर्भागृहात श्रीनाथांचे दर्शन घेतल्यानंतर दक्षिण दरवाज्याने बाहेर पडून काळूबाईचे दर्शन घेऊन, देवालयास उजवी घालून मारुतीचे दर्शन घ्यावयाचे पुन्हा पादुकांचे दर्शन घेऊन कासवावर आल्यानंतरच श्रीनाथांभोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण होते. मंदिराला पूर्व दरवाजा व दक्षिण दरवाजा असे दोन दरवाजे आहेत. यात्राकाळात सर्व काठ्या, पालख्या पूर्व दरवाज्याने आत येतात. तसेच माघ शुद्ध पौर्णिमेला - लग्नाच्या दिवशी सर्व काठ्या, पालख्या अंधार चिंचेच्या झाडाखाली जाण्यासाठी दक्षिण दरवाज्याने जातात. माघ पौर्णिमा व श्री काळभैरव जन्मोत्सव हे श्रीनाथ म्हस्कोबा दैवताचे वर्षातील प्रमुख उत्सव आहेत. माघ पौर्णिमेला श्री क्षेत्र वीर येथे मोठी यात्रा भरते.
माघ पौर्णिमेपासून दशमीपर्यंत दहा दिवस यात्रा चालते. महाराजांची काठी, पालखी व छबिना दहा दिवसांपर्यंत चालतो. तसेच पंचमीपासून दशमीपर्यंत वर्षांचे भविष्य (भाकणूक) सांगितली जाते. वर्षातून सलग १० दिवस यात्रा चालणारे भारतातील हे एकमेव स्थान असून, वीरला दक्षिण काशी असे म्हणतात. दर वर्षी सर्वसाधारणपणे पाच लाख भाविक यात्रेला येतात.... येथे दर रविवारी,अमावस्येला आणि पौर्णिमेला भंडारा असतो. या देवापाशी शिंगाडे यांना प्रथम मान असतो
Comments
Post a Comment