Skip to main content

जरीआई – मरीआई


जरीआई – मरीआई : उग्र प्रकृतीची एक भारतीय क्षुद्रदेवता. ‘जरी’ म्हणजे तापाची साथ. ‘मरी’ म्हणजे पटकी, देवी यांसारख्या रोगांची साथ. प्राणघातक साथींच्या रोगांची एक देवी कल्पून ती ‘जरी-मरी’ वा ‘जरीआई-मरीआई’ ह्या नावाने महाराष्ट्रात तसेच दक्षिण भारतात पूजिली जाते.  मरीआईचेच ‘मरीअम्म’, ‘मारी’, ‘मरीमाय’, ‘मरीभवानी’ अशी नामांतरे प्रदेशपरत्वे आढळतात. जरी-मरीचे स्थान गावात एका कोपऱ्याला किंवा गावाबाहेर एखाद्या झाडाखाली असते. देवळातच तिची प्रतिष्ठापना करावी, असा नियम नाही. कोठे तिच्यावर केवळ आच्छादन असते, तर कोठे नैसर्गिक स्थितीतच स्थानापन्न झालेली दिसते. तिच्या उत्पत्तीबाबत विविधकथा रुढ आहेत. एका चांभाराने आपण ब्राह्मण असल्याचे भासवून एका ब्राह्मणकन्येशी विवाह केल्याची मरीआई ही मूळची आंध्र प्रदेशातील देवता असावी, असे प्र. कृ. प्रभुदेसाई यांचे मत आहे. तिचा पुजारी प्राय: शूद्र वर्णातील असून त्याला पोतुराजा वा पोतराज म्हणतात. ते मरीआईचा देव्हारा डोक्यावर घेऊन गावोगाव फिरत असते.  आंध्र प्रदेशात अनेक गावी तिची पूजा होते. कर्नाटकात कारवार जिल्ह्यातही शिर्सी येथे मारीचे एक मंदिर असून दरवर्षी तेथे तिची यात्रा भरते. तिच्या भक्तांत खालच्या वर्णातील लोकांचाच अधिक भरणा आहे. तिच्या यात्रेच्या वेळी तिला कोंबडा, बकरा, मेंढा, रेडा यांचा बली देतात. देवीची मूर्ती लाकडी व शेंदूरचर्चित असते. शेंदूर हे रक्ताचे प्रतीक असून त्यातून तिची रुधिरप्रियता व तामसवृत्ती दिसून येते.

जरीआई-मरीआई
जरीआई-मरीआई

दक्षिण भारतातील पोलेरम्मा नावाची ग्रामदेवताही मरीआईचेच रूप असून तिच्याबाबत रेड्याशी तिची झुंज झाल्याची कथा रूढ आहे. रोगराईपासून ती गावाचे संरक्षण करते, अशी समजूत आहे. पश्चिम महाराष्ट्रात मारीलाच मरीआई, विदर्भात मरीमाय व उत्तर भारतात मरीमाई, मरी वा मरीभवानी म्हणतात. उत्तर भारतातही ती पटकीसारख्या प्राणघातक साथींच्या रोगांची देवता मानली जाते. उत्तर प्रदेश तसेच पंजाबातही तिला कोंबडा, बकरा, रेडा इत्यादींचा बली देतात. एकाच घावात बली द्यावयाच्या प्राण्याचे शिर धडापासून वेगळे व्हावयास पाहिजे, असा ह्या बलिविधीचा संकेत आहे. तिला संतुष्ट केल्याने गावावरील रोगराईचे संकट टळते,  अशी तेथील लोकांचीही श्रद्धा आहे.

महाराष्ट्रात तसेच दक्षिण भारतातील मरीआईच्या पूजाद्रव्यात कडुनिंबाच्या पाल्याला विशेष महत्त्व आहे.  पोतराज हा मरीआईचा उपासक वा भगत असून त्याच्या मार्फत मरीआईला प्रसन्न करून घेता येते, अशी सर्वत्र समजूत आहे. गावात आलेल्या साथीच्या शमनार्थ मरीआईचा गाडा गावसीमेपर्यंत नेण्यासाठी पोतराजच लागतो. मंगळवारी वा शुक्रवारी हा गाडा गावसीमेपर्यंत नेण्याचा विधी होतो. त्यामुळे गावातून साथ सीमेपार जाते अशी लोकश्रद्धा आहे. हा गाडा सीमेपार नेण्याच्या कार्यक्रमाला वा विधीला ‘जरी-मरीची जत्रा’ म्हणतात. भाविक लोक तिला विविध नवस करतात व ते मोठ्या श्रद्धेने फेडतात. बगाड घेणे, विस्तवावरून अनवाणी चालणे, शरीरातून दाभण वा सुया टोचून घेणे इ. प्रकारे शरीरक्लेश करून घेण्याचे प्रकार ह्या नवसात विशेष आढळतात. पोतराजालाच काही ठिकाणी जरीमरी वा कडकलक्ष्मी म्हणतात.

पहा : ग्रामदैवते पोतराज.

संदर्भ :

1. Dubois, Abbe, J. A. Beauchamp. H. K.Hindu Manners, Customs and Ceremonies,  Oxford, 1959.

२. जोशी, महादेवशास्त्री, गाजती दैवते, पुणे, १९५९.

३. प्रभुदेसाई, प्र. कृ. आदिशक्तीचे विश्वस्वरुप अर्थात देवीकोश, खंड ३ रा, पुणे, १९६८.

सुर्वे, भा. ग.

Comments

Popular posts from this blog

मराठय़ांचे प्राचीनत्व ९६ कुळी म्हणजे काय आहे?

The History of India