मुलनिवासीवाद आणि महात्मा फुलेंचा सिद्धांत


रविवार, १९ जून, २०१६

मुलनिवासीवाद आणि महात्मा फुलेंचा सिद्धांत



ज्यांनी एकमय समाजा सारखा आदर्श आपल्यासमोर ठेवला. त्यांच्याच नावावर काही संघटना मुलनिवासीवाद या सारखा घातक विचार पसरवताना आपणाला दिसतायेत. (खरंतर मूलनिवासी संकल्पना हि तशी घातकी नाहीये पण त्याला द्वेषाची किनार लावल्यामुळे त्याचं स्वरूप घातकी झालंय)

महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून सत्यशोधन करून लोकांना जागृत करण्याच काम केलं. तर मूलनिवासी वादी अर्धसत्य मांडून लोकांची दिशाभूल करून आपला अजेंडा राबवताना दिसतायेत.

त्यांचा अजेंडा आहे एका वर्गाचा द्वेष करून त्यांना भारताबाहेर हकलण्याचा. त्यासाठी त्यांना महात्मा फुलेंच्या सिद्धांताचा आधार घ्यावा लागतो. कारण महात्मा फुले हे बहुजनांसाठी आदरणीय आहेत. आणि म्हणूनच मुलनिवासीवाद्यांना त्यांच्या सिद्धांताला महात्मा फुलेंच्या सिद्धांताचा आधार त्यांना घ्यावा लागतो.

महात्मा फुलेंच्या संपूर्ण चरित्र वाचले तर ब्राह्मण व्यक्ती म्हणून कोणाचा द्वेष करताना ते दिसत नाहीतच. पण त्यांनी जो आर्य-अनार्य सिद्धांत मांडलाय तो सुद्धा या मुलनिवासीवाद्यांच्या सिद्धांता सारखा नाहीये हे आपण त्यांचं समग्र वाङमय वाचलं तरी लक्षात येत.

त्यांच्या साहित्यातील काही भाग तोडून मोडून मुलनिवासीवादी लोक प्रचार करतात.

महात्मा फुलेंनी कोणत्याही जाती व वर्गातील  मनुष्याचा द्वेष कधी केला नाही.

हो पण वर्चस्ववादी भूमिकेतून वावरणार्या  व तथाकथित श्रेष्ठत्व मिरवून बहुजनांच शोषण करणार्या ब्राह्मणांविरोधात ते बोलले आहेत. आणि तशी वर्णने त्यांच्या साहित्यात भरपूर आढळतात. पण त्यांनी मनुष्य म्हणून कोणाचाही कधीच द्वेष केला नाही.

त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह काढला.

त्यानी ब्राह्मण विधवा स्त्रीचा मुलगा दत्तक घेतला.

ख्रिस्त महंमद मांग ब्राम्हणासी धरावे पोटाशी बंधुपरी ।

असे म्हणणारे महात्मा फुले खरच कोणाचा द्वेष करणारे असू शकतील काय ?

तरीही त्यांच्या सिद्धांताची / साहित्याची मोडतोड करून मुलनिवासीवाद्यानी त्याचा प्रचार करून त्याचा स्वतःच्या संकल्पनांना आधार म्हणून उपयोग केला.

महात्मा फुलेंनी आर्य-अनार्य सिद्धांत मांडला असला तरी त्यांच्या सिद्धांतात आणि मुलनिवासीवाद्याच्या सिद्धांतात फरक आहे अस जे वर मी सांगितलं ते पुढील त्यांच्याच साहित्यातील उतार्यावरून स्पष्ट होईल :-

'....हल्ली ज्यास कोकणस्थ ब्राह्मण म्हणतात त्यांनी आपल्या इरानातून व बलिस्थानात येतेवेळी आपल्या बरोबर देशस्थ ब्राह्मणास घेऊन आले नाहीत. कारण हे मूळचे बलिस्थानातील क्षेत्रस्थ असावेत म्हणून कित्येक गोष्टीवरून सिद्ध करता येते. आर्यानी तेव्हा या बलिस्थानावर स्वाऱ्या केल्या तेव्हा त्यांनी मूळच्या देशस्थास ख्रिस्ती मुसलमानांसारखे आपल्या आर्य धर्मात सरते करून घेतल्यानंतर त्यांस यजुर्वेद वाचून पाहण्याचा अधिकार दिला असावा असा अदमास करीता येतो.........या शिवाय बहुतकरून शूद्रादीअतिशुद्रांचे कुलस्वामी, देवके, गोंधळ, भराड वैगरे देशस्थाशी मिळतात.....

(सार्वजनिक सत्यधर्म पुस्तिका)

आपल्या हस्तगत करून घेतलेल्या जमिनीची लागवड सुरळीत रीतीने करण्याच्या उद्देशानें दस्यु लोकांपैकी प्रल्हादासारख्या कित्येक भेकड व धेर्यहीन अशा लोकांनी स्वदेश बांधवांचा पक्ष उचलून आर्य ब्राह्मणांशी वैरभाव धरून तदनुरूप आरंभापासून तो शेवट पर्यंत कधीही हालचाल केली नाही. त्यास गावोगावच्या कुलकरण्याचे कामावर मुकरर करून आपले धर्मात सरते करून घेतले. यावरून त्यास देशस्थ ब्राह्मण म्हणण्याचा प्रघात पडला आहे. कारण देशस्थ ब्राह्मणांचा व येथील मुळच्या शुद्र लोकांच्या रंगरूपाशी चालचलणुकीशी व देव्हार्यावरील कुलस्वामींशी बहुतकरून मेळ मिळतो.

( शेतकर्याचा असूड)

या उतार्यावरून समजते कि महात्मा फुले सर्वच ब्राह्मणांना इराणी आर्य म्हणत नाहीत. ते ब्राह्मणातल्या एका वर्गाला येथील मुलनिवासीच मानतात आणि अशाच प्रकारची मतं थोड्याफार फरकाने आताच्या इतिहासकारानी देखील मांडलेली आहेत.

या मतात आणि मुलनिवासीवाद्याच्या मतात फरक आहे. महात्मा फुलेंच्या सिद्धांतातील या मतामुळे मुलनिवासीवाद्याच्या मूळ हेतूला हरताळ फासला जात असल्याने हि गोष्ट त्यांना माहीत असून देखील ती महात्मा फुलेंना मानणार्या वर्गासमोर सांगत नाहीत. खरतर आताची पिढी खूप हुशार आहे ती असल्या खोटेपणाला फसणार नाही / फसू नयेत. कोणत्याही महापुरुषांचे मूळ विचार स्वता वाचूनच आपण या खोटेपणातून वाचू शकू आणि असा खोटेपणा पसरविणार्यापासून लांब राहू शकू. आणि हे केलं तर मुलानिवासीवाद हा आपोआप संपून जाईल.

ग्रंथ वाचताना मनी शोध करा, देऊ नका थारा वैराभावा । - महात्मा फुले

कोणताही इतिहासकार असो मग तो मार्क्सवादी असो अथवा मुलनिवासीवादी, हिंदुत्ववादी असो नाहीतर फुले-आंबेडकर वादी. कोणाचीही मत १००% बरोबर असू शकत नाहीत त्याच बरोबर कोणाचीही मतं १००% चूक असू  शकत नाहीत.

त्या मतांची योग्य चिकित्सा करून संदर्भतपासूनच ती पुढील संशोधनासाठी ग्राह्य मानली गेली पाहिजेत.(ग्राह्य मानण्यास हरकत घ्यायचं कारण नाही तरीहि त्यावर पुन्हा चर्चा होऊ शकते)

प्रत्येक पुढची पिढीही अश्याच पद्धतीने इतिहास संशोधनात पुढची पायरी चढत चढत इतिहासातील सत्याच्या जवळ पाऊल टाकत असते.

त्यामुळे सत्यापर्यंत पोह्चवणारा प्रत्येक दुवा हा महत्वपूर्णच असतो.

महात्मा फुले हे आद्य भारतीय समाज शास्त्रज्ञ होते.

महात्मा फुलेंनंतर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर , कॉ. शरद पाटील आणि सध्याच्या काळात डॉ. आ. ह. साळुंखे व बरेच विचारवंत संशोधक , अभ्यासक , बहुजन समाजातून निर्माण झालेले आहेत/ होत आहेत. आणि पुढेही होतील यात संशय नाही.

यातील सर्वांचीच सर्व मत आपणाला प्रत्येकाला पटण्यासारखी नसली तरी त्यांचा (प्रत्येकाचा) या सत्यशोधनात अमूल्य वाटा आहे. हे नाकारण्यात अर्थ नाही.











कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Comments

Popular posts from this blog

मराठय़ांचे प्राचीनत्व ९६ कुळी म्हणजे काय आहे?

The History of India

जरीआई – मरीआई