प्राचीन भारताचा इतिहास
- Get link
- X
- Other Apps
गुरुवार, २६ जानेवारी, २०१७
प्राचीन भारताचा इतिहास - भाग १
" एक ग्रीक तत्वज्ञ झिनोफेनस असे म्हणतो की, अनेकेश्वरवाद हा अनाकलनीय व विरोधी आहे. एकेश्वर वाद हेच खरे तत्व होय. तात्त्विक दृष्टया या ग्रीक तत्ववेत्याचे म्हणने खरे आहे. पण ऐतिहासिक दृष्टया एकेश्वरवाद व अनेकेश्वर वाद दोन्हीही खरे आहेत अशी दोन मत असने स्वाभाविक आहे. ज्या समाजाची घडण अनेक जमातींची मिळून एकत्र झालेली असते त्या समाजात अनेकेश्वरवाद स्वाभाविक असतो, अटळ असतो. प्रत्येक प्राचीन समाज हा केवळ माणसांचाच नव्हे तर माणसे आणि त्यांचे देव यांचा बनलेला होता. हे समाज एकमेकांशी एकरूप व्हायचे. मिसळायचे, तर एकच गोष्ट व्हावी लागते.....एका समाजाचे देव दुसर्या समाजाने स्वीकारायचे. अशा मुळेच अनेक देव पद्धती वाढत गेली. हिंदू समाज हा अनेक जनजातींचा बनलेला आहे. प्रत्येक जनजातीचा देव वेगळा. मग देवांची संख्या वाढली. हे देव एकमेकांशी भांडतायेत, त्यांची एकमेकात चढाओढ आहे."
(हिंदुत्वाचे कोडे - डॉ. आंबेडकर)
अनेक देव पद्धत असलेल्या कोणत्याही समाजाची जडण-घडण वेगवेगळ्या समाजातुन बनलेली असते त्यात हिन्दू समाजाचा देखिल अंतर्भाव होतो.
भारतात हिन्दू धर्म जवळपास 80% आहे. त्यामुळे भारताचा इतिहास शोधणं म्हणजे एकप्रकारे हिन्दू धर्म निर्माण होण्याआधी जे अनेक पृथक समाज घटक होते त्यांचा एकामेकांमधिल संघर्ष-समेट-स्थिरता-मिलन या टप्प्याचा इतिहास शोधणं हे त्यात अंतर्भूत होत.
प्राचीन भारताचा इतिहास शोधण्यासाठी सिंधु संस्कृती चा उपयोग होत असला तरी सिंधु संस्कृतीची लिपि अजुन वाचता येत नसल्यामुळे आपल्याला सिंधु संस्कृतीची धार्मिक बाजू समजू शकलेली नाही. तेथे मिळालेल्या मूर्ति-प्रतिमावरुन कोणतिहि मत मांडता येत नाही. सिंधु संस्कृती आणि धार्मिक वाड़मय या दोन्हिच्या अभ्यासातून काही मान्यवरानी मत मांडली आहेत तरीही ती किती बरोबर असु शकतात हे सांगता येत नाही.
इतिहासाचे प्राध्यापक व्ही.डी. महाजन या विषयी म्हणतात -
"सिंधु लिपिचे रहस्य आजही कायमच आहे तिच्या उत्पत्ती बद्दल अनेक विचार मांडले जातात. काही विद्वानांच्या मते सिंधुच्या खोर्यातिल संस्कृती ही आर्य संस्कृतीपेक्षा प्राचीन ठरते. येथील लोकभाषा आणि लिपी सर्वकाही द्रविड होते. या मताला पृष्टि देणारे जे लोक आहेत त्यात रेवरंड हेरस व जॉन मार्शल हे सर्वप्रथम ठरतात ( प्राचीन भारत का इतिहास पृ. ६१)
शेवटी ते म्हणतात "सिंधु लिपिच्या उत्पत्ती बाबत निश्चयापुर्वक काही सांगणे अशक्य आहे. भविष्यात तिचे संशोधन करण्यावरच ही गोष्ट स्पष्ट होइल" (पृ.६३)
"व्हीलर - या लिपीचे वाचन करण्यासाठी योग्य साधने अजुनतरी उपलब्ध नाहीत.सिंधु लिपी अर्ध सांकेतिक लिपी सारखी आहे. त्यात ६० मुळ अक्षरे असून त्यापासून बनवलेली एकुण ६०० अक्षरे आहेत. मुळ चिन्ह मानव किंवा मत्स्य असून त्यापासून अनेक क्लिष्ट अक्षरे बनाविली आहेत" (पृ.६४)
या अक्षरापैकी कोणत्याही अक्षराबाबत निश्चित ज्ञान पुरातत्वीय विभागाच्या विद्वानाना नाही तरी काही मान्यवरानी ती वाचल्याचा दावा केला आहे.
रे.फादर हेरास यांनी मोहनजोदड़ो चित्रलिपिचे वाचन केले होते. ते पुराणवस्तु संशोधक व प्राचीन इतिहासाचे प्रोफेसर होते. त्यांच्या परिश्रमाची उदाहरणे आपल्या कोलेज मधील लोकांना देऊन डॉ. आंबेडकर त्यांच्या कार्याविषयी स्तुती करत. पण तरीही डॉ.आंबेडकरानी त्यांच्या संशोधनात कोठेही सिंधु संस्कृतीचे दाखले दिलेले नाहित याच कारण सिंधु लिपिच्या कोणत्याही वाचनाला पुराणवस्तु विभागाने मान्यता दिलेली नाही आणि म्हणुनच डॉ. आंबेडकर यांनी पूर्णता उकल न झालेल्या सिंधु संस्कृतीचा दाखला आपल्या संशोधनात दिलेला नाही.
या लेखात सुद्धा आजपर्यंत वापरण्यात आलेल्या मार्गांचाच वापर करून इतिहास जाणन्याचा प्रयत्न केला आहे. या व्यतिरिक्त अन्य कोणताही मार्ग सध्यातरी आपणाकडे नाही.
पण सिंधु संस्कृती जाणन्याच्या या मार्गावर अधिकृतरित्या मान्यता नाही. त्यामुळेच लेखात निघालेले निष्कर्ष मला योग्य वाटत असले तरी त्यावर कोणीही शिक्कामोर्तब करू शकत नाही. या लेखातील मुद्दे योग्य की अयोग्य हे येणारा काळच ठरवेल.
प्राचीन वैदिक साहित्यात आपणास अनेक टोळ्यांचा उल्लेख मिळतो. या टोळ्यांच्या संघर्ष आणि समन्वयातुनच आजची संस्कृती उदयास आली.
ऋग्वेदाचा काळ साधारण पणे इ.स.पु. १५०० मानला जातो. पण काही अभ्यासक तो काळ त्याही अगोदरचा मानतात. इतका अगोदरचा की सिंधु संस्कृतीच्या बरोबरीचा मानतात.
वेदांशी संबंधित समाजाला वैदिक म्हटले जाते. या वैदिक समाजालाच आर्य देखिल म्हटले गेले.
ऋग्वेदात (६-११-४ ; ७-१५-२) वैदिक समाज हा ५ टोळ्यानी बनलेला आहे असे म्हटलेले आहे.
निरुक्तात यास्काच्या मते या पाच टोळ्या म्हणजे गंधर्व , पितृ , देव , असुर आणि राक्षस होत.
तर औपमन्य याच्या मते या पाच टोळ्या म्हणजे चारवर्ण व निषाद लोक होत.
पण हे दोन्ही संदर्भ अनुक्रमे उत्तर काळातील असावेत. वर्णव्यवस्था ही निश्चित उत्तर काळातील आहे. त्यातही वर्णव्यवस्था प्रामुख्याने तीन वर्णांशी संबंधित होती. चौथा शुद्र वर्ण हा दुसर्या क्षत्रिय वर्णाचाच भाग होता. हे डॉ. आंबेडकरांनी सिद्ध केलेल आहे.
हिंदी आर्यातील (१) ब्राह्मण (२) क्षत्रिय (३) वैश्य प्रमाणे हिंदी इराणियन लोकात सुद्धा तीन वर्ण होते. ते वर्ण म्हणजे (१) आथ्रव (२) रथेष्टर (क्षत्रिय) (३) वसत्र्य (पशुयाट) [ ref. Geiaer civilization of the Eastern Iranian in ancient time./ शुद्र पूर्वी कोण होते - डॉ. आंबेडकर ]
यातही कोणताही चौथा वर्ण दिसत नाही कारण तो नंतर च्या काळात निर्माण झालेला आहे.
आर्यांच्या मुलस्थानाबद्दल अनेक मत आहेत. जर्मन अभ्यासक मैक्समुलर व श्वेगेल यानी आर्यांच मूलस्थान मध्य आशियातील र्होड व इराणच्या उत्तरेस व कास्पियन समुद्राच्या पूर्वेस असावे असे मानले आहे.
प्रा. मायर्स आणि प्रा. चाइल्ड यानी आर्यांचे मुळ वस्तिस्थान दक्षिण रशिया असल्याचा सिद्धांत मांडला.
गॉइल्स या विद्वानाने डान्युबचे खोरे त्या काळात निवास योग्य म्हणुन त्याला आर्यांचे मूलस्थान मानले.
लोकमान्य टिळकांनी 'दी आर्टिक होम इन वेदाज' या मध्ये आर्यांचे मूलस्थान उत्तरध्रुव म्हणुन दर्शवले आहे.
कोसंबी यांनी हिंदी संस्कृती आणि अहिंसा या ग्रंथात आर्यांच मूलस्थान सांगितले नसले तरी आर्यांचा संबंध एलाम, बाबिलोनिया यांच्याशी दाखवून त्यांनी आर्य हे पर्शियन आखाताच्या किनार्याने भारतात (सिंधु देशात) आले असे सांगितले आहे.
डॉ. आंबेडकरानी आर्य आक्रमण सिद्धांत पुर्णतः नाकारला नव्हता. पण त्यांच्या मते शुद्रत्वाच्या नियमाशी आर्य आक्रमणाच्या सिद्धान्ताचा संबंध नाही त्यांच्या मते वैदिक काळातील शुद्र हे आर्यांच्या धर्माशी संबधीतच लोक होते. त्यांचा शुद्र पूर्वी कोण होते ? हा ग्रंथ आर्यांच्या मूलस्थान शोधासाठी लिहिलेला नसून शुद्रांशी संबंधीत बंधने कशी निर्माण झाली याचा शोध त्या ग्रंथात घेतलेला आहे ( अधिक माहिती साठी माझा मूलनिवासीवाद आणि डॉ आंबेडकरांचा सिद्धांत हा ब्लॉग वाचा.)
आर्य/अर्य -
आर्य हा शब्द ३३ ठिकाणी तर अर्य हा शब्द ८८ ठिकाणी रुग्वेदात वापरला आहे
अर्य हा शब्द (१) शत्रु (२) सभ्य माणुस (३) भारताचे नाव (४) मालक वैश्य किंवा रहिवाशी अश्या निरनिराळ्या अर्थाने तो वापरला आहे
आर्य या शब्दाबद्दल मैक्समुलर म्हणतात -
"अर किंवा आर हे जगातील फार जुने नाव पृथ्वीला देण्यात आले होते. असे या शब्दांवरून मला वाटते. या शब्दांचा अर्थ नांगरलेली जमीन असा होतो. हे शब्द संस्कृत वाङ्ग्मयातून लुप्त झालेले आहेत. पण ग्रीक वाङ्गमयाने त्याना जपून ठेवले आहे. ग्रीक वाङ्गमयात इरा हां शब्द आहे. जमीन धारण करणारा किंवा जमीन पेरणारा या अर्थाने तो शब्द आर्यानी वापरले असावेत. जो नांगरतो किंवा पेरतो असा आर्य शब्दाचा धातुवाचक अर्थ होतो असे माझे मत आहे"
साधारणतः आर्य हे भटके लोक होते अश्या स्वरुपाची मत प्रचलित आहेत जर मैक्समुलर यांची मत बरोबर असतील तर आर्य हे भटक्या स्वरुपाचे लोक होते या मताला बाधा निर्माण होते ?
असुर -
ऋग्वेदात इंद्र (१.५४.३), वरुण (१.१४.२४), मित्र, अग्नि (४.२.५, ७.२.३), रुद्र (५.४२.११) इत्यादि देवाना असुर हे विशेषण लावलेल आहे
जर असुर हे विशेषण आर्य देवतानाच लावलेल असेल तर कधीकाळी असुर वैदिक धर्माचाच भाग होते हे सिद्ध होते.
असुर शब्दाचा खरा अर्थ प्राणवान , बलवान , सामर्थ्यवान असा आहे.
असु म्हणजे प्राण त्यापासून हा शब्द साधला आहे.
ऋग्वेदात (९-७१-२) असुरानी वर्ण (धर्म) सोडण्याचे वर्णन आहे. कदाचित ते असुरांच्या एका गटाशी संबधीत असून त्यानीच पुढे अहुरी (असुरी) धर्माची स्थापना केली. या संघर्षातुनच पुढे असुर शब्द बदनाम झाला असावा.
अनायुधासो असुरा अदेवा: (ऋग्वेद ८/९६/९)
या वाक्यात तर असुरापैकी देव तेव्हा त्यांच्याशिवाय इतर हे असुर असे म्हटलेल आहे. याचा अर्थ असुरातुनच देव (विशिष्ट व्यक्ती) निर्माण झाली आणि त्यांचा संघर्ष हया असुरांशीच (सामान्यांशीच) झाला.
दास/दस्यु/दैत्य/दानव/द्रविड/नाग -
दास/दानव या शब्दांचा मुळ अर्थ दाता असा आहे. तरीही यांचा अर्थ धार्मिक साहित्यात देवांचे विरोधक राक्षस म्हणुन आला आहे.
दास या शब्दाचा आणखी एक अर्थ डॉ. आंबेडकर सांगतात. -
"दासांना नाग लोकांपासून वेगळे करण्यात याहीपेक्षा मोठी चुक इतिहासकारानी केली आहे. दास व नाग हे एकच लोक होत. वैदिक वाङ्गमयात नाग लोकांनाच दास असे का संबोधण्यात आले हे कळणे कठीण नाही. दहाक या इंडो-इराणीयन या शब्दाचे संस्कृती करण केलेले रूप दास हे होय. दहाक हे नाग लोकांच्या राजाचे नाव होते. या मुळे त्याच्या राजाच्या नावावरून आर्य लोक त्याना दहाक म्हणु लागले. परंतु संस्कृत मध्ये त्याचे रूप दास असे बनले व संपूर्ण नाग लोकांसाठी ते वापरण्यात येऊ लागले. नाग लोक कोण होते ? निसंशय ते अनार्य होते."
" आता द्रविड लोक कोण होते ते पाहू. ते नागलोकांपेक्षा भिन्न वंशाचे लोक आहेत काय ? की एकाच वंशाच्या लोकांना दिलेली ती वेगवेगळी नावे आहेत ? द्रविड आणि नाग हे भिन्न वंशाचे लोक आहेत असा सर्व साधारण समज आहे. या माझ्या विधानाने अनेकाना धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. तथापि द्रविड आणि नाग ही एकाच वंशातील नावे आहेत."
( अधिक माहितीसाठी वाचा अस्पृश्य मुळचे कोण - डॉ. आंबेडकर )
वैदिक साहित्यात दास दस्यु बद्दल खालील उल्लेख आलेले आहेत
दस्यु शहरात राहत असत (ऋ १-५३-८) (१-१०३-३)
दस्यु श्रीमंत होते (ऋ १-३३-४)
दस्यु अव्रत (आर्य जेथे विधि करतात तेथे ते विधि करण्यास अपात्र आहेत) (ऋ १-५१-८-९ ; १-१३२-४)
अन्यव्रत ( आर्यांपेक्षा वेगळे विधि पाळणारे )
अनग्नित्र ( अग्नि न पुजणारे )
अयज्वन (यज्ञ न करणारे)
दासांना मृधवाक (ऋ ७-६-३) व अनस (ऋ ५-१९-१०) ही दोन विशेषणे वापरली आहेत.
अनस चा अर्थ सायणाचार्यानी बिनतोंडाचा म्हणजे चांगली बोली न बोलणारा असा केला आहे.आर्याना दासांची भाषा समजत नव्हती हेच कारण दासाना मृधवाक व अनस हे विशेषण लावण्यात झाले.
अहिवृत्र हा नाग असून त्याला दास किंवा दस्यु म्हटलेल आहे. सिंधु देशावर त्याचे राज्य होते.
या सर्व मांडणीतुन दास/दानव/द्रविड/नाग हे एकच लोक होते व ते अनार्य होते हे सिद्ध होते
नाग विरुद्ध आर्य विरुद्ध आर्य -
भारतात दोन वंशांचे लोक राहत असून ते दोन वंश म्हणजे आर्य व नाग (दास) असे डॉ. आंबेडकरांचे मत होते. त्यातही आर्य येण्या आगोदर भारतात नागवंशीयच लोक राहत होते असेच त्यांच मत होते.
"तामिळ किंवा द्रविड भाषा केवळ दक्षिण भारताची नसून आर्य येण्यापूर्वी संपूर्ण भारताची ती भाषा होती" असे मत डॉ. भांडारकरांचा दाखला देत डॉ. आंबेडकर मांडतात (अस्पृश्य मुळचे कोण ?)
डॉ. मार्शल यांनी सिंधु संस्कृतीचा काळ इ.स.पु. ३१०० ते २५०० असा ठरवला आहे.
इ.स.पु. २५०० ती पुर्ण विकसित अवस्थेत होती.
सर जॉन मार्शल , डॉ. व्हिलर या संस्कृतीला आर्यपूर्व मानतात.
मैक्समुलर ने आर्यांचा भारतात प्रवेश काळ इ.स.पु. १५०० मानला आहे.
परंतु हरियुपिया (हरप्पा) च्या संरक्षण तटबंदी जी उध्वस्त केली गेली, तो काळ इ.स.पु. २२५० च्या ही अनेक शतकापुर्वीचा आहे असेही अनेकांच मत आहे.
( केतकर ज्ञान कोष परिशिष्ट मध्ये इंडियन अँटिक्वेरीतील लेख आहे त्यात म्हटले आहे - शतपथ ब्राह्मणांत एके ठिकाणीं (११.१,२ पहा.) असा उल्लेख आला आहे कीं, सत्तावीस नक्षत्रांपैकीं फक्त कृत्तिका नक्षत्रच नेहमीं पूर्वबिंदूवर उगवतें. यावरून हें उघड होतें कीं, शतपथ ब्राह्मणाचा हा भाग लिहिला गेला तेव्हां संपातबिंदु कृत्तिकानक्षत्रांत असला पाहिजे. संपातबिंदु दर वर्षीं क्रांतिवृत्तांत ५० सेकंद मागें सरकतो असें जरी गृहीत धरलें तरी शतपथ ब्राह्मणाचा काळ ख्रिस्ती शकापूर्वीं सुमारें ३००० वर्षें निघतो !)
याचा अर्थ इ.स.पु. २२५० च्या ही आधी आर्य भारतात आले असा निष्कर्ष निघतो. या मान्यवरांच्या मतातुन भारतात आर्य येण्याचे दोन भिन्न काळ आपल्या समोर आहेत. या दोन मतापैकी आर्यांचा भारतात प्रवेश काळ निश्चित करण्याआगोदर आणखी काही विद्वानांची मत आपण पाहुया.
डॉ आंबेडकर आर्यांबद्दल म्हणतात -
" आर्य हे एकजिनसी लोक नव्हते. ही गोष्ट निर्विवाद आहे. त्यांची विभागणी दोन गटात झाली होती. हेही शंकातीत आहे. हे दोन गट दोन भिन्न संस्कृतीचे होते, याबद्दलही वाद नाही. या पैकी एका गटास ऋग्वेदी आर्य व दुसर्या गटास अथर्ववेदी आर्य असे म्हणता येइल. त्यांच्यामधील सांस्कृतिक भेद विकोपास गेल्याचे स्पष्टपणे दिसून येते. ऋग्वेदी आर्यांचा यशावर विश्वास होता. अथर्ववेदी आर्यांचा जादूटोण्यावर विश्वास होता. त्यांच्या पौराणिक कथाही वेगवेगळ्या होत्या. ऋग्वेदी आर्यांचा जलप्रलयाच्या कथेवर आणि मनुपासून त्यांचा वंश निर्माण झाला यावर विश्वास होता. अथर्ववेदी आर्यांचा जल प्रलयाच्या कथेवर विश्वास नव्हता. ते त्यांच्या वंशाची उत्पत्ती ब्रह्मा किंवा प्रजापतीपासून झाली असे समजत असत. त्यांच्या साहित्याचा विकासहि भिन्न दिशांनी झाला. ऋग्वेदी आर्यानी ब्राह्मणे , सूत्रे , आणि आरण्यके रचली. तर अथर्ववेदी ब्राह्मणानी उपनिषदे रचली. त्यांच्या मधील हा सांस्कृतिक संघर्ष इतका तीव्र होता की ऋग्वेदी आर्यानी बराच काळपर्यंत अथर्ववेदांचे किंवा उपनिषदांचे पावित्र्य मान्य केले नाही. आणि जेव्हा त्याना मान्यता देण्यात आली तेव्हा त्याना वेदान्त म्हणजे वेदाच्या कक्षेबाहेरचे असे त्याना संबोधण्यात आले. आज वेदान्त या शब्दाचा अर्थ वेदांचे सार असा करण्यात येत असला तरी त्या काळी तो याच्या उलट होता. म्हणुनच अथर्ववेदाचा किंवा उपनिषदाचा अभ्यास 'अनुलोम' (अध:पात) मानण्यात येत असे"
(अस्पृश्य मुळचे कोण - डॉ. आंबेडकर)
सिंधु सभ्यता यात किरणकुमार थपल्याल व संकटाप्रसाद शुक्ल यांनी शि. रंगनाथ राव यांचे मत उद्धृत केले आहे. शि. रंगनाथ राव यांचे असे मत आहे की, आर्य हे अनेक समूहात आले होते आणि या समुहापैकी काही समूह ऋग्वेदी आर्यांच्यासुद्धा आगोदर आलेले होते. ज्या समयाला ऋग्वेदी आर्य भारतात आले. त्या समयापर्यंत त्यांच्यापूर्वी आलेले आर्य येथील लोकांमध्ये मिसळुन गेलेले होते. तसेच येथील लोकांची संस्कृती आणि भाषा यामुळेही ते फारच प्रभावित झालेले होते. ऋग्वेदी आर्यानी त्याना असुर मुध्रवाच आणि वैदिक आचारविचाराना न मानणारे म्हणजे अनार्य असे संबोधले आहे. वैदिक साहित्यातच सुर आणि असुर याना मुळात एकाच वंशाचे मानले गेले आहे. राव यांचे मतानुसार ऋग्वेदात वर्णन केलेले दाशराज्ञ युद्ध सुद्धा पूर्वी आलेले आर्य (पुरु) आणि नंतर आलेले आर्य (भारत) यांच्यामध्ये झालेले युद्ध होते.
(सिंधु सभ्यता पृ ३०९ / प्राचीन भारतातील नाग - एच. एल. कोसारे)
डॉ. आंबेडकर आर्यांच्या दोन गटांचा उल्लेख करतात. त्याला ते ऋग्वेदी आर्य व अथर्ववेदी आर्य म्हणतात. शि. रंगनाथ राव सुद्धा ऋग्वेदी आर्यांच्या अगोदर आलेल्या आर्यांचा उल्लेख करतात. प्रसिद्ध दाशराज्ञ युद्ध सुद्धा आर्य समाजातील आपआपसातील संघर्ष होता.
या माहिती वरून आर्यांच्या आगमनाच्या काळासंबधी जी दोन वेगळी मत होती. त्याची उत्तर आपणास मिळतात.
ऋग्वेदी आर्यांचा भारतातील आगमन काळ इ.स.पु. १५०० असला तरी त्या आगोदर आलेले अथर्ववेदी आर्य हे इ.स.पु. २२५० च्याही काही शतके आगोदर आलेले होते.
इंद्राने त्वष्टाच्या सहायाने वज्र तयार करून वृत्र नागाची हत्या केली. हा संदर्भ कदाचित आगोदरच्या आर्यांशी संबधीत असून नंतर दिवोदास-सुदासाच्या काळात दुसर्या आर्यांचा संदर्भ येतो तो काळ महाभाराताच्या थोड्या आगोदरचा आहे. महाभारताचा काळ पा.वा.काणे यानी इ.स.पु. १३०० च्या जवळचा मानला आहे.
पहिल्या आर्यांच्या आक्रमणानंतर त्यांचा दासांशी संघर्ष झाला. पुढिल काळात समेट देखिल झाला व पाहिले आर्य स्थिर झाले. दुसरे आर्य जेव्हा सिंधु देशात पोहोचले तेव्हा त्यांचा संघर्ष या पहिल्या आर्यांशी व दासांशी झाला याचे उल्लेख वेदात आढळतात.
"हे इंद्रा ! सिंधु नदीच्या तीरावर राहणार्या क्रूर राक्षसांच्या आणि आर्यांच्या तावडितुन तू आम्हाला मुक्त केलेस. तू दासांच्या हातून त्यांची शस्त्रे हिरावून घे" (ऋ ७-२४-२७)
दस्यु राक्षस आणि आर्य देव हे अंगावर सोन्याचे व चांदीचे दागिने घालून ते किल्ल्यात राहत असत. (ऋ २-२०-८)
"हे इंद्रा ! आमचे शत्रु (विरोधक) दास व आर्य या दोघानाही तू ठार केले आहेस" (ऋ ६-३३-३)
"सुदासाचे शत्रु दास व आर्य याना इंद्र व वरुण यानी ठार मारले व याप्रमाणे त्यानी दास व आर्य यांच्यापासून सुदासाचे रक्षण केले." (ऋ ७-८१-१)
पहिले आर्य हे अथर्ववेदी आर्य होते. बर्याच विद्वानांच्या मते अथर्ववेदातील काही मंत्र हे ऋग्वेदपेक्षाही जुने आहेत.
या आर्यांच्या प्रवेशानंतर त्यानी काही दासानाही व्रात्यस्तोम विधीद्वारे आपल्या आर्य धर्मात परावर्तीत करून घेतले. असे उल्लेख वेदात आहेत त्याच बरोबर त्याना आर्य धर्मातुन काढल्याचेहि वर्णने वेदात आढळतात.
" हे वज्रि तू तुझ्या शक्तिने दासाना आर्य करून टाकलेस. दृष्ट लोकांना तू सुष्ट केलेस" (ऋ ६-२२-१०)
"(इंद्र म्हणतो) मी दस्युंचे आर्यत्व नष्ट केले आहे" (ऋ १०-४९-३)
आर्यांच आगमन इ.स.पु २२५० च्या आगोदर झालेल असेल तर सिंधु संस्कृतीतील अवशेषात आर्यांची देखिल अवशेष आहेत हे आपणास मान्य कराव लागेल.
मोहनजोदड़ो येथील उथ्खननात तेथील स्मशानभुमी सापडलेली नाही तरी वस्तीच्या भागात काही मानवी सांगाडे सापडले होते . सव्वाशे वर्षापूर्वी त्यांचा अभ्यास रॉबर्ट सेवेल आणि बी.एस. गुहा यानी केला. त्या सागांड्यात सहा मेडिटेरिअन , तीन प्रोटो अॉस्ट्रोलाइड , एक मंगोलाईड , आणि चार अल्पाइन होते.
अल्पाइन वंश हा आर्यभाषिक होता असे अनेक मान्यवरांचे मत आहे. असे जर असेल तर सिंधु संस्कृतीच्या काळी आर्य लोक होते असे मानावे लागते.
हडप्पा येथे आर-३७ ही स्मशान भूमी नागरी सिंधु काळातील आहे तर एच स्मशानभूमी उत्तर कालीन आहे. हे लोक भिन्न वंशाचे लोक आहेत असे शास्त्रज्ञांचे मत आहे.
एच स्मशानभूमी आर-३७ च्या जवळ असून त्यात दफनाचे दोन थर आहेत. खालच्या थरात दफनाचा पुरावा आहे. तर वरच्या थरात दहनाचा पुरावा आहे. खालच्या थरातीलही दफने दोन प्रकारची आहेत. पूर्वेकडील भागात खड्ड्यात पुरलेले पुर्ण मानवी सांगाडे आहेत. तर पश्चिमेकडील भागात फक्त काही अस्थिंचे दफन केलेले आढळते.
(कोणे एके काळी सिंधु संस्कृती - मधुकर ढवळीकर)
नाग (दास) हे स्वत:ला पृथ्वीचे पुत्र मानतात. त्यामुळेच त्यांच्या मृत्युनंतर त्यांच्या प्रेतांचे अंत्य संस्कार दफनाच्या स्वरूपात होत. आजही द्रविड़ी परंपरा मानणारे लोक हे प्रेत दहन न करता ते प्रेत दफन करतात. पेशवाई काळापर्यंत कुणबीसह सर्व तथाकथित खालच्या जातीच्या माणसांची प्रेते खड्डा करून पुरतच असत (पेशवेकालीन समाज व जातीय संघर्ष - डॉ. पी.ए. गवळी)
दक्षिणेत अशोकाच्या काळापर्यंत स्थायिक झालेले जे लोक होते ते प्रामुख्याने द्राविड लोक होते. त्या काळच्या दक्षिणेकडील उत्खननात दहन केलेला एकही पुरावा मिळत नाही.
आर्याच्या जीवनात अग्नीच स्थान महत्वपूर्ण असल्यामुळे आर्यांचे अंतिम संस्कार हे दहन पद्धतीनेच केले जात होते. या उलट दास हे अग्निला अपूज्य मानीत.
आर्य-अनार्य यांच्या अंत्य संस्कारातील फरकाबद्दल उल्लेख महाभारतातसुद्धा आलेला आहे.
विदुर हा व्यासाला दासीपासून झालेला मुलगा होता. व्यास हा विदुराचा बिजन पिता होता. त्यामुळे त्याचा वर्ण विदुराला लागला नाही. ज्या दासीपासून तो जन्मला त्या दासीचा जो धर्मपती होता त्याचा वर्ण विदुराला मिळाला. त्या नुसार विदुर शुद्र ठरला. विदुराची आई अनार्य नाग गणाची असल्याचं शरद पाटील सांगतात.
विदुराचा मृत्यू झाल्यावर युधिष्ठिर विदुराचा दाहक्रिया करायचा विचार करताच आकाशवाणी होते :-
"अरे राजा या विदुर नामक कलेवाराचा तो यतिधर्माचे पालन करत असल्याने दाह संस्कार करणे योग्य नाही. दाहक्रिया न करणे हाच सनातन धर्म आहे. तो सांतानिक लोकाला प्राप्त होणार असल्याने त्याच्याबद्दल शोक करू नकोस"(महाभारत १५.२६.३१-३३)
युधिष्ठिराचा बिजन पिता विदुर होता. याची चर्चा कॉम्रेड शरद पाटील यांनी आपल्या पुस्तकात केलेली आहे. कोणालाही समजू नये म्हणून विदुर युधिष्ठराशी म्लेंछ भाषेत बोलत असे. असे उल्लेख महाभारतात आलेले आहेत. इतर पांडव फक्त आर्यभाषा जाणत असे.
सिंधु संस्कृतीत सापडणारे अवशेष दोन भिन्न संस्कृतीच्या लोकांचे होते हे स्पष्ट आहे.
लोथलच्या संदर्भात शि. रंगनाथ राव यांनी म्हटले आहे की , लोथल येथील जे प्राचीन कालीन अवशेष मिळाले आहेत. त्यावरून पशुबली दिली जाणे, अग्निपूजा केली जाणे आणि घोडे तसेच तांदळाचा वापर हे सिंधु संस्कृतीच्या लोकांचे निदर्शक आहेत. लोथल लोक रथांशी सुद्धा परिचित होते. असे त्यांचे अनुमान आहे. राव यांचे असेही मत आहे की ऋग्वेदी आर्य हे जरी ग्रामवासी राहिले असले तरी त्यांच्या पूर्वी आलेले आर्य हे नगरातील लोकांचा एक भाग होते. सिंधु संस्कृतीच्या लोकसमुहातील जातींमध्ये ऋग्वेदी आर्यांच्या पूर्वी आलेले आर्य सुद्धा होते.
(सिंधु सभ्यता पृ. ३०९ / प्राचीन भारतातील नाग - कोसारे)
व्रात्य :-
ज्यांना वर्णव्यवस्थेत स्थान असूनही ज्यांचं उपनयन झालेले नाही असे जे लोक असत त्यांना व्रात्य लोक म्हणत त्यांना पुन्हा वैदिक धर्मात घेण्यासाठी व्रात्यस्तोम ने शुद्ध करून पुन्हा वैदिक धर्मात घेतले जात असे. त्याच बरोबर एखादा नवीन (आर्यांच्या बाहेरचा) व्यक्ती वैदिक धर्मात यायची इच्छा दर्शवित असेल तर त्यालाहि या व्रात्य स्तोम द्वारा शुद्ध करून वैदिक धर्मात घेतले जात असे.
म्लेंच्छ -
म्लेंच्छ शब्दाचा सध्याचा अर्थ दुसर्या धर्माचा असा होतो पण प्राचीन काळी त्याचा अर्थ वेगळा होता.
सिंधु लोकांचा व्यापार दुसर्या देशांशी होत होता. अक्केडियन राजा पहिला सार्गन (इ.स.पु. २३३४ - २२७९) च्या एका लेखात पुर्वेकडच्या तिन देशांचा उल्लेख आहे. त्यांची नावे अनुक्रमे डिलमुन , मकन , आणि मेलुहा अशी दिलेली आहेत. त्यातील डिलमुन म्हणजे बहरीन, मकन म्हणजे ओमान-इराण बलुचिस्थानचा मकरान किनारा आणि मेलुहा म्हणजे भारत.
मेलुहा या शब्दाच प्राकृत रूप मेल्लख आणि संस्कृत रूप म्लेंच्छ होते.
याचा अर्थ सिंधु देशाचे मुळ नाव म्लेंच्छ होते. नागानाच प्राचीन इतिहासात म्लेंच्छ म्हटले गेले. नंतर म्लेंच्छ या शब्दाचा अर्थ दुसर्या धर्माचा असा झाला. पुढे आर्यांच या प्रदेशात वर्चस्व प्रस्थापित झाले. त्यामुळे या प्रदेशाला नंतर आर्यावर्त म्हटले गेले. अनेकांनी पुराणांचा दाखला देत आर्य राजा भरत यावरून या देशाला भारत नाव मिळाल्याचे सांगितले आहे. पण जर हे बरोबर असते तर याला एखादा शिलालेखीय आधार असता. अशोकाच्या शिलालेखात तो या देशाचा उल्लेख भारत असा न करता जंबुद्वीप असा करतो. आर्यावर्त हे नाव म्हटलं जातं होतं या म्हणण्याला आधार आलेल्या प्रवाशी लोकांचा (ईत्सिंग) मिळतो. आर्यावर्त सुद्धा विंध्यच्या उत्तरेकडील भागाला म्हटलं जातं होतं. सिंधूनदीच्या जवळील लोकांना पर्शियन भाषेमुळे हिंदू हे नाव मिळाले. पर्शियन भाषेत सिंधूचे हिंदू झाले. हिंदू हा शब्द हिंदू धर्माच्या कोणत्याही प्रमुख ग्रंथात आढळत नाही. परकीयांनी दिलेलं नाव हिंदू धर्माला चिकटण्यात आले. त्याच प्रमाणे या देशात प्रचंड बौद्ध विहार होते. विहार चे बिहार>बहार>बहारत>भारत असे झाले असण्याची शक्यता काहींनी वर्तवली आहे. नेहरू यांच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया मध्ये बल्ख येथे जो विहार होता त्याला नवं-विहार असे नाव होते असे म्हणून त्याचा पर्शियन भाषेत नौ बहार असा पुढे अपभ्रंश झाल्याचे म्हटलेलं आहे. हिंदू हे नाव सुद्धा पर्शियन अपभ्रंशमुळे झाल्याचे आपण पाहिलंच. भारत हे नाव सुध्दा विहार वरूनच अपभ्रंश झालं असण्याची शक्यता आहे. नंतर या नावाचा संबंध पुराणातून भरत या राजाशी जोडण्यात आला. महाभारताचं मूळ ग्रंथनाव सुद्धा केवळ 'जय' होतं हे सुद्धा विचार करण्यासारखं आहे.
- Get link
- X
- Other Apps

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा