भीमा-कोरेगाव हल्ल्याचा निषेध


गुरुवार, ११ जानेवारी, २०१८

भीमा-कोरेगाव हल्ल्याचा निषेध

१ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव युद्धाला २०० वर्ष पूर्ण झाल्यामुळे भीमा कोरेगाव या ठिकाणी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी देशाच्या वेगवेगळ्या भागातून दलित ओबीसी मुस्लिम या सर्व समाजघटकातून लाखोंच्या संख्येने लोक तेथे आले होते. व शांततेत अभिवादन करून जात होते. या शांततेत अभिवादन करण्यासाठी आलेल्या लोकांवर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला. यानंतर मात्र याचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले. ३ जानेवारी रोजी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला. गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, पंजाब तसेच देशाच्या इतर भागात सुद्धा या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला. संसदेत सुद्धा हे प्रकरण चांगलंच तापलं. प्रधानमंत्री यांनी नेहमी प्रमाणे मौन बाळगलं.


या हल्ल्यात सर्वात आधी ज्यांची नावे आली ते म्हणजे मनोहर (संभाजी) भिडे व मिलिंद एकबोटे यांची. यांच्यावर नंतर गुन्हेही दाखल झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे मनोहर भिडेंसोबत चांगले संबंध आहेत. त्यांचे फोटोज हे सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. आता जर भिडेना अटक झाली तर प्रधानमंत्र्यांची देशभर बदनामी होईल की काय म्हणून भिडेना सध्यातरी अटक झालेली नाही. किंबहुना त्यांना वाचवण्यासाठीच विषयाला वेगळं वळण दिलं जात आहे. व त्याचा प्रसार माध्यमातून (मीडिया) केला जात आहे. या प्रकरणामुळे का होईना पण भारतीय मीडिया ही पेड मीडिया आहे हे लोकांसमोर येत आहे. माध्यमांची विश्वासार्हता संपल्यातच जमा आहे.


फक्त न्यूज चॅनेलच्या माध्यमातूनच अपप्रचार केला जात आहे असं नव्हे तर काही ब्लॉग लेखकांच्या माध्यमातून ही अपप्रचाला पसरविण्याचं काम जोरात चालू आहे. हिटलर गोबेल्सला ही लाज वाटेल इतक्या पद्धतशीर पणे ही मंडळी काम करताना दिसत आहेत. भीमा कोरेगाव च्या सुनियोजित हिंदुत्ववादी संघटनांच्या हल्ल्याला वेगळं वळणं देण्यात ही वेगवेगळी माध्यमं काम करत आहेत.

भिडे एकबोटे यांना या प्रकारातून बाहेर काढण्यासाठी ३१ डिसेंबर रोजी शनिवार वाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेतून काही आक्षेपार्ह मिळत आहे का याचा शोध पोलीस घेण्याचा प्रयत्न करतायेत. जिग्नेश व उमर खालिद यांच्यावर गुन्हेही दाखल झालेत.

३१ डिसेंबर रोजी होणाऱ्या या एल्गार परिषदेला ब्राह्मणी व हिंदुत्ववादी संघटनेचा सुरुवातीपासूनच विरोध होता. मिलिंद एकबोटे हेही त्याविरोधात होते. पण कायदेशीर मार्गाने त्या एल्गार परिषदेला ही मंडळी विरोध करू शकली नाही. म्हणून मिलिंद एकबोटे यांच्या संघटनेने बेकायदेशीर मार्गांचा वापर करून आंबेडकरी संघटनांना उत्तर म्हणून कोरेगाव भीमाचा हल्ला घडवून आणला असण्याची शक्यता आहे. कारण हल्ल्याच्या एक दिवस आधीपासूनच ही वातावरण निर्मिती हिंदुत्ववादी संघटनांकडून झाली होती. सोशल मीडियावर तसे फोटोज फिरत होते.

संभाजी महाराजांच्या चरित्रातील महत्वपूर्ण योगदान असणारे गोविंद महार यांची समाधी आदल्या दिवशीच हिंदुत्ववाद्यानी पाडली होती. १ जानेवारीला जे लाखो लोक येणार त्यांची गैरसोय व्हावी म्हणून कोरेगाव भीमा व आजूबाजूच्या गावांनी बंद सुद्धा पाळला होता. घरांवर आंबेडकरी अनुयायांवर हल्ला करण्यासाठी दगडही साठवून ठेवली गेली होती. भगवे झेंडे, शस्त्रे घेऊन जोरजोरात ओरडत आलेल्या अनुयायांवर हल्ले चढवले गेले. मिलिंद एकबोटे व मनोहर(संभाजी) भिडे यांनीच हा कट रचल्याचा संशय आहे. कारण या गावात भिडे आणि एकबोटेंची आदल्या दिवशी सभा असल्याचे सोशल मीडियावर जाहीर करण्यात आले होते. आता या कटाला वेगळं वळण देण्यासाठी उच्छ्वर्णीय प्रसार माध्यमं व सरकारचे लोक पुढे सरसावले आहेत.

माध्यमातून हा हल्ला नक्षलवादी होता असा प्रचार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकार आपल्या बचावासाठी नक्षलवाद, आतंकवाद, पाकिस्तानचा हात कसा आणतात हे आपल्याला चांगलंच माहीत आहे. बिहार व गुजरात निवडणुकीत पाकिस्तानचा कसा हात आहे हाही प्रचार लोकांनी पाहिला. असे तथ्यहीन प्रचार करणारे हिंदुत्ववादीच असतात असे नाही. असा बावळट प्रचार करणारे सो कॉल्ड पुरोगामी सुद्धा मागे नाहीत. वेगवेगळी आंदोलन दडपण्यासाठी बहुतेक वेळा असे आरोप केले जातात. खैरलांजी हत्याकांड घडल्यानंतर झालेल्या आंदोलनात नक्षलवादी आहेत असा जावई शोध काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारमधले आर.आर.पाटील यांनी लावला होता. आता पुन्हा मोठं आंदोलन भाजपच्या विरोधात उभं राहतेय त्यामुळे त्यांनी सुद्धा या शस्त्राचा वापर केला आहे. या पक्षांशी संलग्न असणारे पेड विचारवंत हा अपप्रचार घडवून आणतात. आंबेडकरी जनतेकडे अश्या माध्यमांची कमी असल्यामुळे ते अपप्रचाराला रोखू शकत नाही ही दुःखद गोष्ट आहे.

 ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांना न्याय मिळावा अशी राजकारणी व विचारवंतांकडून अपेक्षा बाळगणे चुकीचं होईल. किंबहुना न्याय मागणाऱ्या लोकांचीच विटंबना या लोकांनी चालवली आहे. या लोकांकडे दुर्लक्ष करून न्यायालयाच्या माध्यमातून आंबेडकरी जनतेला न्याय मिळेल अशी आशा बाळगूया.

Comments

Popular posts from this blog

मराठय़ांचे प्राचीनत्व ९६ कुळी म्हणजे काय आहे?

The History of India

पंढरीनाथ