वढु-बुद्रुक प्रकरण आणि आंबेडकरी समाज


शुक्रवार, १२ जानेवारी, २०१८

वढु-बुद्रुक प्रकरण आणि आंबेडकरी समाज

२९-१२-२०१७ रोजी वढू बुद्रुक या ठिकाणी गोविंद महार यांच्या समाधीची विटंबना करण्यात आली.५० लोकांवर ऍट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हेही दाखल झाले. पुढे म्हणजे ३१ तारखेच्या आधीच दोन्ही बाजूंच्यालोकांकडून समझोता होऊन ते गुन्हे मागेही घेण्यात आले. (समझोता या करारावर करण्यात आला की अभ्यासपूर्वक माहिती घेऊन गोविंद गायकवाड यांचा उल्लेख बोर्डावर करण्यात येईल व गुन्हेगारांवर असलेल्या अट्रोसिटी मागे घेण्यात येतील) आता या समझोत्यामुळे वडू गावातील वाद पूर्णपणे मिटला होता. मग असं कोणतं कारण होते की ज्याने १ तारीख या दिवशी कोरेगाव या ठिकाणी आलेल्या भीमसैनिकांवर हल्ला करण्यात आला ?

या वादाचं मूळ कारण शोधायला गेलं तर असे दिसते की काही वर्षांपासून वढू बुद्रुक या परिसरामध्ये मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांसारख्या हिंदुत्ववादी लोकांचा जोरदार प्रचार सुरू आहे. ही मंडळी इतिहासाचं विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न मागील काही वर्षांपासून सतत करत आहेत. शिवाजी महाराजांना व संभाजी महाराजांना कट्टर हिंदुत्वाच्या रंगात रंगवण्याचा सतत यांचा प्रयत्न असतो. शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या चरित्रातील आताच्या मुस्लिम, बौद्ध समाजघटकांना जोडणारे दुवे हे लोक इतिहासाचं विद्रुपीकरण करून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणून गोविंद महार या संभाजी महाराजांच्या चरित्रातील पात्राला इतिहासातून बेदखल करण्याचं कारस्थान ही मंडळी करत आहेत.         
मराठा तरुणांची माथी भडकवून त्यांच्यामार्फत गोविंद महार यांच्या समाधीची विटंबना करण्यात आली. ज्या दिवशी ही घटना घडवली गेली ती तारीख निवडण्याला सुद्धा काही तशीच कारणं देखील आहेत. शनिवार वाड्यावर भिमाकोरेगाव स्मृती निमित्त काही आंबेडकरी, डाव्या व पुरोगामी संघटनांनी ३१-१२-२०१७ रोजी एल्गार परिषद भरवली होती त्या एल्गार परिषदेला हजारो संख्येने दलित आदिवासी, मागासवर्गीय हजर राहणार होते. या एल्गार परिषदेला सुरुवातीपासूनच मिलिंद एकबोटे व इतर हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध होत होता. व या एल्गार परिषदेचा शनिवार वाड्याचा कार्यक्रम रद्द करता यावा म्हणून त्यासाठी या संघटनांनी जंग जंग पछाडले होते. सोशल मीडियावरून या शौर्यदिनाविरोधात विकृत प्रचार देखील करण्यात आला होता. याने सुद्धा काही भागले नाही म्हणून की काय पुढे गोविंद महार यांच्या समाधीची विटंबना देखील करण्यात आली. इतक्या सर्व घटना हिंदुत्ववाद्यानी घडवून सुद्धा शनिवार वाड्यावर कार्यक्रमाला परवानगी मिळाली व कार्यक्रम देखील शांततेतच पार पडला. पण त्यामुळे हिंदुत्व वाद्यांची धुसफूस अजूनच वाढली. सोशल मीडियावर वडू बुद्रुक येथे मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांची सभा आयोजित केली गेली आहे असे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. १ जानेवारी हा शौर्यदिन आंबेडकरवादी साजरा करतात म्हणून हिंदुत्ववाद्यानी त्या दिवशी काळादिवस जाहीर केला. भीमा कोरेगाव या ठिकाणी ग्रामपंचायतीने ठराव पास करून १ जानेवारी रोजी बंद पाळण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावरून आदल्या दिवशी फिरणाऱ्या पोस्टमुळे हिंदुत्ववादी युवक हजारोंच्या संख्येने कोरेगावच्या आजूबाजूच्या गावात जमा झाले. रस्त्यालगतच्या घरांवर दगडांचे साठे तयार करून ठेवण्यात आले. व भिमाकोरेगाव ठिकाणी येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांवर दगड फेक करण्यात येऊ लागली. त्यांच्या गाड्या फोडण्यात आल्या. हा सर्व हिंसक प्रकार तेथे घडत होता. पोलीस कायदा व्यवस्था राखण्यात अपयशी झाले. खरंतर हिंदुत्वावाद्यांनी घडवलेल्या घटनाक्रमानंतर तेथे चोख बंदोबस्त ठेवला गेला पाहिजे होता. पण अशी चोख व्यवस्था राखली गेली नाही परिणामी हिंसक हल्ल्याला आंबेडकरी अनुयायांना तोंड द्यावे लागले. लहान मुले, स्त्रिया वृद्ध माणसे यांना त्रास सहन करावा लागला नंतर २-४ दिवस याचे पडसाद देशाच्या सर्व भागात उमटले.

तसं पहायला गेलं तर गोविंद महार यांच्या समाधीच्या विटंबनेचा कोणताही प्रभाव आंबेडकरी अनुयायांवर पडला नाही.(त्याचं कारण गोविंद गायकवाड यांची विटंबना होईपर्यंत आंबेडकरी अनुयायांना सुद्धा हे गोविंद गायकवाड कोण आहेत हे माहीत नव्हते) कारण विटंबना २९ तारखेला घडून सुद्धा ३१ तारखेला एल्गार परिषद शांततेत पार पडली होती. व दुसऱ्या दिवशी हिंदुत्ववाद्यांचा हल्ला झाल्यानंतर एक दिवसांनी त्याची प्रतिक्रिया म्हणून बंद पाळला गेला. तो बंद सुद्धा गोविंद महार यांच्या समाधीच्या विटंबनेच्या विरोधात नसून लहान मूल, वृद्ध लोक, स्त्रिया यांच्यावर हल्ला केल्याच्या विरोधात बंद पाळला गेला. याचा अर्थ आंबेडकरी अनुयायांनी हवं तितकं महत्व गोविंद गायकवाड यांना दिलेलं नव्हतं. महत्व द्यायला पाहिजे की नको हा भाग वेगळा व भविष्यात त्यांना महत्व देण्यात येईल की नाही हाही विषय वेगळा आहे. कदाचित या प्रकरणानंतर त्यांना जास्त महत्वही देण्यात येईल. 

गोविंद गायकवाड कोण होते ?

गोविंद गायकवाड हे ज्या समाजाचे होते त्यांनीच त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर इतरांनी त्यांकडे दुर्लक्ष केलं असेल तर त्यात नवल नाही. त्यातही गोविंद गायकवाड हे अस्पृश्य समाजाचे होते त्यामुळे अस्पृश्याच्या इतिहासाला जेव्हढ महत्व देण्यात येत तेवढंच महत्व स्वाभाविकपणे गॊविंद गायकवाड यांना दिलं गेलं.

त्यातही महाराष्ट्रातील इतिहासकारांची परंपरा अगदीच थोर होती. आचार्य अत्रे या 'थोर' परंपरेबद्दल म्हणातात -

"१९३४ साली पेशवे दफ्टराचे संशोधन करण्यासाठी त्यावेळच्या मुंबई सरकारने रियासतकार सरदेसाईंच्या नेतृत्वाखाली एक इतिहासपारंगत विद्वानांचे मंडळ नेमले होते. रियासतकारांना सहाय्यक म्हणून आमचे परममित्र प्रा. कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी ह्यांची नेमणूक केली होती. त्यांनी स्वतः आम्हा सांगितलेली ही गोष्ट त्यांच्या हयातीत आम्ही प्रसिद्ध करू शकलो नाही. कारण, तशी त्यांची आम्हाला आज्ञा होती. काय झाले की, एक दिवस या सर्व संशोधकांना पेशवे दफ्टरात नाना फडणवीसाने ठेवलेल्या रखेल्यांचा यादीचा एक कागद अचानक पणे मिळाला. तो सर्वांनी एकत्र मिळून मिटक्या मारत वाचला नि त्याची जाहीर नोंद करण्याचेही सर्वानुमते ठरले. तथापि हा कागद जेव्हा सरदेसाई शोधायला गेले तेव्हा तो बेपत्ता झाल्याचे त्यांना आढळले, सरकारी दफ्टरातुन बाहेर कागद नेणे तर अशक्य होते. मग हा कागद नाहीसा कसा झाला. त्याची हकीगत आमचे मित्र नाना कुलकर्णी गंभीर चेहरा करून सांगत की, "अहो, आमच्यापैकी एकाने हा कागद बसल्या-बसल्या त्याचे बारीक तुकडे करून सरळ गिळून की हो टाकला !" जणू काही नाना फडणविसाच्या रखेल्याची यादी प्रसिद्ध झाली असती तर सदर इसमाच्या बापजाद्यांची बेअब्रू झाली असती !
"नाना फडणवीसांच्या 'रखेल्यां' गिळंकृत करणारा हा माणूस इतिहास संशोधक म्हणून महाराष्ट्रात विद्यमान आहे . आपल्याला अनुकूल असेल तेव्हढाच पुरावा ठेवायचा नि बाकीचा नष्ट करून टाकायचा ही महाराष्ट्रातल्या इतिहास संशोधकांची इतिहासघातूक प्रवृत्ती इतिहासामध्ये राजवाड्यांपासून चालत आलेली आहे. हाच महाराष्ट्राच्या इतिहासातील सत्य संशोधनाला खरा शाप आहे."

( कर्हेचे पाणी - आचार्य अत्रे )

अशी जर उच्चवर्णीय इतिहास संशोधकांची मानसिकता असेल तर दलित आदिवासींबद्दलच्या इतिहासाचं काय झालं असेल हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. त्यांच्या इतिहासाबद्दलचे पुरावे नष्ट केले गेले नसतील काय ? हा आरोप फक्त आचार्य अत्रेच करतात अश्यातला भाग नाही. अनेकांनी असे आरोप केलेले आहेत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर देखील म्हणतात - "हल्ली जे इतिहास संशोधक आहेत ते सर्वच आपल्या सदसद्विवेकबुद्धीला जागून खरा इतिहास बाहेर काढतील अशी फारशी आशा मला तरी वाटत नाही. आपल्या जातीचा इतिहास उज्वल राहावा या हेतूने पुष्कळ इतिहास संशोधकांनी हिंदू समाजातील अंतरव्यवस्थेवर प्रकाश टाकणाऱ्या काही महत्वाच्या कागदपत्रांची जाळपोळ केल्याचे मी ऐकले आहे"

आता जर अस्पृश्यांच्या एखादया इतिहासातील घटनेमुळे जरी उच्चवर्णीय अहंकार दुखावला जात असेल तर स्वाभाविक उच्चवर्णीय तो इतिहास दडपण्याचा प्रयत्न करतील.

वर दिलेल्या घटनांच्या अनुषंगाने गोविंद गायकवाड ह्या संभाजी चरित्रातील पात्राकडे आपण पाहायला हवे. 

पेशवे दप्तरातील दि. १९ मे १७२३ च्या कागदपत्रातील नोंद पुढीलप्रमाणे :- " गोविंद गोपाळ ढगोजी मंगोजी हे तीर्थरूप राजश्री कैलासवासींचे वृंदावन मोजे वढू तर्फ पाबळच्या राणांत आहे तेथे हे राहून वृंदावनाची सेवा करिताती. याजनिमित्य स्वामी याणी कृपाळू होऊन मौजे वढू तर्फ पाबळ येथील खालसा पड जमिनीपैकी अवल दुम सीमती प्रतीची जमीन बिघे कुलबाब कुलकानु इनाम दिली.  ..."

गोविंद महार यांचा हा पेशवे दप्तरातील उल्लेख महत्वपूर्ण आहे. कदाचित हाही उल्लेख नसता किंवा नष्ट केला गेला असता तर संभाजी राजांच्या चरित्रात कोण्या गोविंद गायकवाड या व्यक्तीचा संबध होता किंवा नव्हता या बाद्दलही संशय निर्माण व्हायला जागा होती. 

या सनदेत प्रामुख्याने असं म्हटलेलं आहे की गोविंद गोपाळ हे तेथे राहून वृंदावनाची म्हणजेच संभाजी राजांच्या समाधीची सेवा करतात (येथे सेवा म्हणजे नेमकं काय हे स्पष्ट नाही) यामुळे त्यांना काही जमीन इनाम म्हणून दिल्याचं सांगितलेलं आहे.

या एका पुराव्यावरून किमान संभाजी राजांच्या समाधीशी गोविंद गायकवाड यांचा संबंध होता हे स्पष्ट आहे (मी शिवकालीन व पेशवेकालीन सर्व कागदपत्रे वाचलेली नाहीत) या संबंधी अधिक संशोधनाने काही उलघडा होऊ शकतो का हे पाहायला हवे.

विश्वास पाटील यांच्या संभाजी या कादंबरीत गोविंद गायकवाड शी संबंधित काही भाग आहे. त्यात गोविंद गायकवाड यांचा संबंध संभाजी राजेंच्या अंत्यविधीशी होता असं त्यांनी मांडलेलं असून ही बाब त्यांनी कादंबरी पुरतीच मर्यादित ठेवलेली नसून त्यांच्या अनेक व्याख्यानांमधून देखील ती मांडलेली आहे. त्याचे व्हिडियोज युट्युबवर कोणालाही पाहायला मिळतील. आता ही बाब त्यांच्याकडे संदर्भ असल्या शिवाय ते मांडणार नाहीत. या सर्व प्रकारणानंतर ते हिंदुत्ववाद्यांच्या दबावाखाली न येता सर्व लोकांसमोर खरं काय ते ठेवतील अशी आशा सर्वांनी बाळगायला हरकत नाही.

काही लोकांचा अपप्रचार 

वर सांगितल्याप्रमाणे वढू गावची घटना शनिवार वाड्यावरचा कार्यक्रम होऊ नये म्हणून कट रचून घडवली गेली होती हे स्पष्ट आहे. तरीही काही लोक या घटनेची विपर्यस्त मांडणी करताना दिसतायेत. हिंदुत्ववाद्यांकडून नेहमी प्रमाणे नक्षलवाद्यांचा हात दाखवायला सुरुवात झालेली आहे तर काही हिंदुत्वावाद्यनी तर चक्क मुस्लिमांचा हात जाहीर केलेला आहे. 

या घटनेच्या मूळ कारणांमध्ये संभ्रम पसरविण्यामध्ये गांधीवादी ही मागे राहिलेले नाहीत. संजय सोनवणी यांनी एका व्हिडियोत असं म्हटलेलं आहे की २५ डिसेंबर पासूनच संभाजी राजेंच्या अंत्यविधीची चर्चा होत असून मराठे भित्रे, मराठे पळपुटे अशी वक्तव्ये झाली, तशी वक्तव्ये असलेली बॅनरबाजी झाली असं त्यांचं म्हणणं आहे. मुळात हा आरोप अत्यन्त बालिश स्वरूपाचा असून हल्ल्याला समर्थन करण्यासाठी पसरवलेली थाप आहे. अशा गोष्टी वढू गावात घडल्या असत्या तर त्याविरोधात कोणाचीही एखादी पोलीस केसची नोंद नाही. अश्या गोष्टी जर घडत होत्या तर एकावर सुद्धा तश्या प्रकारच्या गुन्ह्याची नोंद का झाली नाही. उलट विटंबना केलेल्या ५० जणांवर गुन्हे दाखल झालेत (नंतर ते गुन्हे सामोपचाराने मागे घेण्यात आले हा भाग वेगळा)२९ डिसेंबर रोजी गोविंद गायकवाड यांची समाधीची विटंबना होई पर्यंत हे गोविंद गायकवाड कोण हेच बहुतेकांना माहीत नव्हते. त्यामुळे अश्याप्रकारची चर्चा २९ तारखे पर्यंत तरी कुठे पाहायला मिळणार नाही. २९ तारखे नंतर मात्र अशी चर्चा जरूर पाहायला मिळते. त्याच कारण गोविंद गायकवाड यांची विटंबना झाल्यानंतर अगदी जलदगतीने ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली व त्या रागातून प्रतिक्रिया देताना सोनवणी म्हणतात तशी "प्रतिक्रिया" आली असण्याची शक्यता आहे. ही क्रिया म्हटली गेली नसती तर विटंबनेच्या नंतरची प्रतिक्रिया ठरली असती. पण फार चलाखीने सोनवणी यांनी वादाच खापर दलितांच्या माथी मारण्याचा व दोषींच्या हल्ल्याना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आहे. असो.. ही त्यांनी दलितांच्या विरोधात घेतलेली ही काही पहिली भूमिका नाही या अगोदर सुद्धा दलितांच अत्याचारापासून ज्या कायद्याने संरक्षण होतं तो कायदाच रद्द व्हावा अशी ही त्यांची भूमिका आहे व ती त्यांनी जाहीररित्या मांडलेलीसुद्धा आहे आणि तो कायदा रद्द व्हावा म्हणून ते न्यायलयात सुद्धा जाणार होते. या मुळे का होईना स्वातंत्र्याच्या ६० वर्षानंतर सुद्धा गांधीवादयांचा दलितांबद्दलचा दृष्टिकोन बदलला नाही हे आपल्या समोर आलेलं आहे.

इतिहासाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. इतिहासात जे पुरावे आपल्यासमोर येतात त्याला तर्कशुद्ध पद्धतीने मांडणी करून इतिहास निर्माण होत असतो. एकाच पुराव्यावरून दोन वेगवेगळे तर्क सुद्धा असू शकतात. काही इतिहासकारांनी मल्हारराव होळकर पानीपत मधून पळाले होते अशी मांडणी केली आहे. तर काहींनी ते पळाले नव्हते असे मांडण्याचा प्रयत्न केलाय. ज्याला जे पटेल त्याने ते स्वीकारावं. विरोधी मत मांडले म्हणून हल्ले करणं, विटंबना करणं हा योग्य मार्ग नाही. 

शिवाजी महाराजांच्या समाधी समोर वाघ्या कुत्र्याचा (ऐतिहासिक पात्र असो की नसो मला त्यात पडायचं नाही) पुतळा चालू शकतो. पण वढू गावात संभाजी चरित्रातील एका महार सेवकाची समाधी चालू शकत नाही हे आपल्या भारतीय समाजाची मानसिकता कुठल्या पातळीची आहे याचं निदर्शक आहे.

अशी मानसिकता असलेल्या समाजात आंबेडकरी लोकांनी प्रत्येक पाऊल हे सावधगिरीने पुढे टाकायला हवं. व समाजाला ज्या गोष्टींचा फायदा होणार नाही त्या गोष्टीत उगाच अडकून आपला वेळ वाया घालवु नये हाच एक सल्ला देऊन मी थांबतो.


डावीकडून पहिला बोर्ड गोविंद महार यांचा उल्लेख असलेला गेल्या कित्येक वर्षांपासूनचा आहे. तर मागील दोन वर्षांपूर्वी नवीन बोर्डमधून (उजवीकडील बोर्ड) गोविंद महार यांचा उल्लेख काढून टाकण्यात आलेला आहे. या प्रकरणा मागे मिलिंद एकबोटेच असल्याचं वर्तमानपत्रातील बातम्यांमुळे या आधीच समोर आलेलं आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Comments

Popular posts from this blog

मराठय़ांचे प्राचीनत्व ९६ कुळी म्हणजे काय आहे?

The History of India

जरीआई – मरीआई